नाशिक : शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी व त्र्यंबके श्वर तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. सुमारे तीन आठवड्यांनंतर पावसाने ‘दम’धार हजेरी लावल्याने दिवसभर जनजीवन विस्कळीत प्रभावित झाले. पाणलोट क्षेत्रात दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे गंगापूर धरणातून सातत्याने हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी मध्यरात्री शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये विश्रांतीनंतर पावसाची विक्रमी नोंद झाली असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६२ मिमी इगतपुरी ६६ मि.मी. तर नाशिक शहरात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ३२ मिमी पाऊस झाला. दिवसभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ८.७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद पेठरोडवरील हवामान निरीक्षण कार्यालयाने केली. पहाटे साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत पावसाचा जोर अधिक होता; मात्र त्यानंतर शहरात पाऊस कमी होत गेला; मात्र गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे सातत्याने धरणातून विसर्ग केला जात होता. सकाळी अकरा वाजेपासून गंगापूर धरणामधून विसर्ग सुरू करण्यात आला. प्रारंभी एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाला. धरणसमूहातील गौतमी, काश्यपी, आळंदी या धरणांसह गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.पूर नियंत्रण कक्षाचा ‘संपर्क’ तुटलाजलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाचा ‘संपर्क’ सकाळपासून दुपारी ४ वाजेपर्यंत तुटला होता. कधी दूरध्वनी ‘व्यस्त’ तर कधी कु ठलाही प्रतिसाद समोरून येत नव्हता. पाच वाजेच्या सुमारास संपर्क झाला असता कक्षाला वीजपुरवठा करणाºया फिडरमधून वीजप्रवाह कार्यालयात आल्यामुळे दूरध्वनीला हात लावला की विजेचा ‘झटका’ बसत होता, हे कारण पुढे आले. एकूणच यामुळे दिवसभर पूर नियंत्रण कक्षाचा संपर्क महापालिका आपत्ती व्यवस्थापनासह जिल्ह्यातील नागरिकांशी तुटलेला होता. त्यामुळे धरणामधून होणाºया पाण्याच्या विसर्गाबाबतही उशिरा सूचना अग्निशामक विभागाला मिळत होती. शहरात काहीठिकाणी झाडे देखील पडली.‘दूधसागर’वर तरुणाईची ‘सेल्फी’गंगापूर गावाजवळ असलेल्या ‘दूधसागर’ धबधब्याजवळ तरुणाईने पावसात चिंब भिजत रविवारच्या सुटीचा आनंद लुटला. संततधारेत भिजत कणसाचा आस्वाद घेत धो-धो वाहणाºया धबधब्यासोबत सेल्फी काढताना तरुण-तरुणी दिसून आले. गंगापूर धरणातून सातत्याने होणाºया विसर्गामुळे धबधब्याने रुद्रावतार धारण केला होता. या ठिकाणी दिवसभर कु ठलाही पोलीस बंदोबस्त तैनात नसल्याने पर्यटक निर्धास्तपणे जीवघेणे धाडस करताना दिसून आले.गंगापूर ८८ टक्के भरलेत्र्यंबकेश्वर तालुक्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सातत्याने दिवसभर कायम होता. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९१ मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. यामुळे गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अधिक असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत होती. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या विसर्गामध्ये रात्री ८ वाजेपर्यंत वाढ कायम होती. ८ वाजता एक हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने ७५०० क्यूसेक पाणी नदीपात्रात प्रवाहित होते. गंगापूर धरणात पाच हजार ६३० दलघफू इतका जलसाठा असून, धरण ८८ टक्के भरले आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढविला गेला. दुपारी २ वाजता ४६८० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. संध्याकाळी पाच वाजता पुन्हा दोन हजार क्यूसेकने विसर्ग वाढविण्यात आल्याने सहा हजार ४०० क्यूसेक इतके पाणी नदीपात्रात सोडले जात होते. शहरात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे गोदावरीचा जलस्तर उंचावला. अहल्यादेवी होळकर पुलाखालून संध्याकाळी साडेपाच वाजता नऊ हजार ४७० क्यूसेक पाणी नदीपात्रात प्रवाहित होते.
शहरात पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:01 AM