खेडगाव : दोन दिवसांपासून सुरू असलल्या मुसळधार पावसामुळे परिसरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस विजांच्या कडकडाटासह सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत पडत होता. या पावसाने छाटलेल्या द्राक्षबागा तसेच सुरू असलेल्या टोमॅटो मका वेळीवर्ग भाजीपाला यांचे नुकसान झाले आहे. सगळ्या बागांमध्ये कमरेइतके पाणी साचले असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शेतकरी वर्गास द्राक्ष बागांना फवारणी करताना बागेमध्ये ट्रक्टर चालत नाही तसेच मजुरांअभावी नळीने फवारणी करताना बागेत पाणी असल्याने अडचणी येत आहेत. याही अडचणींवर मात करत शेतकरी घरातील सगळेच लहान मोठे माणसांमार्फत नळ्या खांद्यावर घेऊन फवारणी करत आहे. पण फवारणी करून झाल्यानंतर दुपारी लगेच पाऊस पडल्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाला असून पावसाने पूर्ण मेटाकुटीस आला आहे.हवामान खाते रोज नवीन नवीन पावसाचे अंदाज देत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी घाबरला आहे. द्राक्ष पिकाचे नुकसान हे पाऊस उघडल्यावर सात ते आठ दिवसांनी दिसत आहे. हे नुकसान शासन मान्य करत नाही, कारण डावणी रोगाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागेचे नुकसान ग्राह्य धरले जात नाही. डावणी हा फक्त पोगा स्टेज ला होणार्या पावसामुळे होते सध्या ६० ते ७० टक्के बागांची पोगा स्टेज आहे. त्यामुळे बरेच नुकसान होणार आहे. या वर्षी अति पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले होते. राहिलेल्या टोमॅटोचे मोठे नुकसान झाले असून पूर्ण टोमॅटो या अतिवृष्टी मुले खराब झाली असून एकरी १० ते १२ खोके माल निघतो आहे. तसेच मका सुद्धा सोग्नीला आल्या असून त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. या सगळ्या अस्मानी संकटे शेतकरी झेलत आहे यातून कधी सुटका होईल याची चिंता लागून राहिली आहे.
खेडगाव परिसरात पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 2:55 PM