नाशिक : गेल्या काही दिवसांपासून चातकासारखी ज्याची प्रतीक्षा बळीराजासह सर्वसामान्यांना होती, त्या पावसाने बुधवारी (दि.९) नाशिकसह पूर्व भागातील तालुक्यांत दमदार हजेरी लावली. विशेष म्हणजे मंगळवारी रात्रीही काही भागात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते.बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय मिलिमीटरमध्ये आकडेवारी अशी - नाशिक : १.४, इगतपुरी-००, दिंडोरी-१.०, पेठ-००, त्र्यंबकेश्वर-००, मालेगाव-२८, नांदगाव-२०, चांदवड-१८.२, कळवण-३.४,बागलाण-४४, सुरगाणा-००, देवळा-३७.८, निफाड-२७.२, सिन्नर- २०, येवला-१४ असा एकूण- २१५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल नाशिक शहरात दुपारी तीन ते पाच दरम्यान दोन तास पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर तुरळक स्वरूपात काही भागात पावसाच्या सरी झाल्या. सखल भागात जोरदार पावसामुळे पाण्याची तळी निर्माण झाल्याचे चित्र होते. दुपारी बारा ते दोन वाजे दरम्यान चांदवडसह मालेगाव, बागलाण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात दमदार हजेरी लावली. सायंकाळी पाऊस थांबला होता. मात्र काही भागात तुरळक स्वरूपात सरी सुरू होत्या. पावसाच्या दमदार हजेरीमुळे शहरातील रस्त्यावरून पाणी वाहू लागले. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहरावर आलेले पाणी कपातीचे संकट काही दिवसांपुरते का होईना लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तसेच खरीप पिकांच्या वाढीसाठी या पावसाचा फायदा होणार आहे, तसेच तो रब्बीच्या हंगामासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पावसाचे माहेरघर ‘कोरडे’
By admin | Published: September 09, 2015 11:28 PM