नाशिक : रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सायंकाळी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ७२४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. शहर परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान, नाशिसह मध्य महाराष्टÑात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, अवघ्या ९ टक्क्यांवर आलेला धरणातील पाणीसाठा आता ३३.८५ टक्के इतका झाले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेल्या पाणीकपातीचा फेरविचार होण्याचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबरच दारणा ३८.४१, नांदूरमधमेश्वर ५४.५७, गौतमी-गोदावरी २१.२९, भावली ३९.१२, मुकणे १२ तर कडवा ७.८७ टक्के भरले आहे.दरम्यान, जिल्ह्णात पावसाचा जोर अजूनही कायम असून, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत इगतपुरीत ५७८, तर त्र्यंबकेश्वरमध्ये ३६३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी (दि. ८) सकाळपासूनच या ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे.दरम्यान, गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असली तरी मध्यरात्री पूर काहीसा ओसरला आहे. हवामान खात्याने पुढील चार तासांत वर्तविलेली पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने यात्रेकरू, भाविकांना अडकून पडावे लागले. तर इगतपुरीमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली.कसारा घाटात वाहतूक संथकसारा घाटात काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे दगड येऊन पडल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून मंदगतीने सुरू आहे. महामार्ग पोलिसांच्या बंदोबस्तात येथील वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. या ठिकाणी रस्त्यावर आलेले दगड काढण्याचे काम सुरू होते.दोन टॅँकर्स झाले कमीजिल्ह्णात पावसाची सुचिन्हे दिसत असली तरी पाण्याची कमतरता कायम आहे. जिल्ह्णात अजूनही २९८ टॅँकर्सद्वारे गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. सिन्नर आणि येवला येथे अनुक्रमे ६४ आणि ६१ चार छावण्या असून चांदवड, देवळा, मालेगाव तसेच नांदगाव येथे चारा छावण्या सुरू आहेत.२७ घरांचे नुकसान; चार जनावरे दगावलीपावसाचा सर्वाधिक फटका हा त्र्यंबकेश्वरला बसला असून, याठिकाणी १८ घरे कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा १४ टक्के झाला इतका वाढला असून, नांदूरमधमेश्वर मधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसाचा सर्वाधिक फटका त्र्यंबकेश्वर, पेठ, येवला आणि इगतपुरी यांना बसला असून, या चारही तालुक्यांमधून एकूण २७ घरांची पडझड झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक १८, पेठ, येवला येथे प्रत्येकी १ तर इगतपुरीत सात घरांचे नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वरला चार जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:47 AM