लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुसळधार पाऊस पडल्यानंतर पावसाळी गटारींच्या अपुऱ्या वहनक्षमतेमुळे तसेच गटारींच्या ढाप्यांवर अडकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या यामुळेच बुधवारी पावसात शहर जलमय झाल्याचा अजब निष्कर्ष महापौर रंजना भानसी यांनी काढला असून, त्यांनी अधिकाऱ्यांची पाठराखण केली. पावसाळापूर्व कामांसाठी नियमानुसार संपूर्ण शहराकरिता एकच ठेका काढला जाणे अपेक्षित असताना, या कामांचे तुकडे करून प्रभागनिहाय ३१ ठेके दिल्याचा प्रकारही महापौरांनी बोलविलेल्या बैठकीत उघड झाला. त्यामुळे भाजपाच्या पारदर्शक कामकाजावर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.बुधवारी (दि. १४) दुपारी साडेचार ते सायंकाळी सहा या दीड तासाच्या कालावधीत शहर व परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचे बिंग फुटले. शहरात पावसाळी गटार योजना तसेच खुले नाले असतानाही पाण्याचा निचरा न झाल्याने शहरात अनेक ठिकाणी तळे साचले. अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना धावपळ करावी लागली. मध्यवर्ती भागात कापडपेठ, सराफ बाजार आणि भांडी बाजारात अक्षरश: हाहाकार उडाला. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. या पार्श्वभूमीवर महापौर भानसी यांनी बांधकाम, आरोग्य व ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावत आढावा घेतला. या बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर, शहर अभियंता यू. बी. पवार, आरोग्याधिकारी सुनील बुकाणे, कार्यकारी अभियंता गौतम पगारे आदी उपस्थित होते.महापौरांचा शिवसेनेला टोलानाशिक जलमय होण्यामागे पावसाळी गटार योजनेची अपुरी वहनक्षमता असल्याचे नमूद करीत महापौर रंजना भानसी यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबईत पावसाळी गटारींची पावसाळी पाणी वहनक्षमता नाशिकपेक्षा कितीतरी पटीने अधिक असताना पावसाळ्यात मुंबईदेखील जलमय होते, असा दाखला महापौरांनी दिला.
पाऊसच दोषी, प्रशासन निर्दोेष
By admin | Published: June 16, 2017 12:57 AM