नाशिक : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्हाभरातील विविध भागात ७८ टॅँकरमध्ये घट झाली असून, अजूनही दुष्काळग्रस्त सात तालुक्यांतील १०७ गावांसह २९७ वाड्यामध्ये ११९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे.जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, देवळा या तालुक्यांमध्ये २९ जुलै रोजी १९७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता, त्यात गेल्या आठवडाभरातील पावसामुळे शनिवारपर्यंत ७८ टँकरची घट झाली आहे.पश्चिम पट्ट्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसासोबतच शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने आणखी जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरून नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. तर पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून, दुष्काळग्रस्त तालुक्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्णातील अवर्षणग्रस्त तालुके अजूनही तहानलेलेच असून, आठ दिवसांच्या पावसामुळे ७८ टँकर घटले असून, गेल्या महिनाभरात २०० टँकर कमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील ७८ टँकर घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 1:19 AM