नाशिक : मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण विचारात घेऊन सकल मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणीच्या शेकडो निवेदनांचा पाऊस सोमवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीसमोर पडला. जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय संघटनांसह शंभरपेक्षा अधिक व्यक्तींकडून एकूण ५३५ निवेदने समितीला प्राप्त झाली असून लवकरच गावांमध्ये थेट सर्वेक्षण करून यासंबंधी अहवाल सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली. मराठा आरक्षणासाठी सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभर जनसुनावणी घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्णातील संस्था, संघटना व समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी सोमवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत शासकीय विश्रामगृहावर सुनावणी ठेवण्यात आली. याप्रसंगी आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांच्यासह सदस्य डॉ. डी. डी. बाळसराफ, डॉ. प्रमोद येवले, सी. व्ही. देशपांडे, डॉ. सुवर्णा रावल, डॉ. भूषण कडिर्ले, सुधीर ठाकरे, डी. डी. देशमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, बळीराजा फाउंडेशन, जिजाऊ ब्रिगेड, छावा आदी शंभरावर संघटनांनी आपल्या मागण्यांचे निवेदने सादर केली. त्यात प्रामुख्याने मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असून मराठा व कुणबी हा एकच समाज असल्याने त्यांना आरक्षण देण्यात यावे, आजोबा, पणजोबा यांच्या जातीच्या दाखल्यावर कुणबी असा उल्लेख असताना नातवांच्या दाखल्यावर मराठा असा उल्लेख आहे. याबाबतचे पुरावे यावेळी समितीला सादर करण्यात आले. मराठा व कुणबी यांच्यात रोटी-बेटीचा व्यवहार होत असल्याचे दाखलेही देण्यात आले. समितीसमोर प्राप्त झालेल्या निवेदनांनी माहिती सायंकाळी प्रसिद्धीमाध्यमांना देण्यात आली. या सर्व संदर्भांचा व पुराव्याचा बारकाइने अभ्यास करून समिती आपला अहवाल सरकारकडे सादर करणार असून, तत्पूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील २ गावांचा नमुनेदाखल सर्व्हे करण्यात येणार आहे. मराठवाड्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कोकण विभागाचा सर्व्हे सुरू आहे. यानंतर लवकरच नाशिक विभागात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात विभागातील एक महापालिका व नगरपालिकेचादेखील समावेश आहे. साधारणत: एक ते तीन हजार लोकसंख्या व मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या गावांची यात निवड केली जाणार आहे. दरम्यान, आयोगातर्फे दि.५ जून रोजी जळगाव येथे व दि.२७ जून रोजी पुणे येथे जनसुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समाज कल्याण विभागाचे राजेंद्र कलाल, उपायुक्त प्राची वाजे, देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते.ग्रामीण-शहरी गावांमध्ये होणार सर्वेक्षणआयोगातर्फे प्रत्येक जिल्ह्णातील पाच तालुक्यांमधील दोन गावांचा सॅम्पल सर्व्हे करण्यात येणार आहे. मराठवाड्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, सध्या कोकण विभागाचा सर्व्हे सुरू आहे. यानंतर लवकरच नाशिक विभागात सॅम्पल सर्व्हे करण्यात येणार आहे. साधारणत: एक ते तीन हजार लोकसंख्या व मराठा समाजाचे प्राबल्य असणाºया गावांची यात निवड केली जाणार आहे. या सर्वेक्षणात विभागातील एक महापालिका व नगरपालिका हद्दीतील गावांचादेखील समावेश असणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.
मराठा समाजाच्या निवेदनांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:25 AM