नाशिक : यंदा पावसाची कृपादृष्टी बरसल्याने राज्यातील धरणे आणि पाणलोट क्षेत्रांची तहान भागली आहे, तर मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर होणारे वाद पुढीलवर्षी टळण्याची सकारात्क बाब या पावसामुळे घडून आलेली आहे. नाशिक जिल्ह्यावरील पावसाची कृपा अजूनही कायम असून, जिल्ह्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याची सरासरीदेखील ओलांडली आहे. जवळपास २१७ मि.मी. अधिक पाऊस या महिन्यात कोसळला असून, येत्या चार-पाच दिवसांत यात आणखी वाढ होण्याचीदेखील शक्यता आहे.यंदा जिल्ह्यात सर्वत्र रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. दुष्काळी तालुके म्हणून ओळख असलेल्या तालुक्यांमध्येदेखील जोरदार बरसलेल्या पावसामुळे तेथील शेतकरी समाधानी झालेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या जल प्रकल्पांपैकी जवळपास २३ प्रकल्पांमधील साठा शंभय टक्क्यांवर पोहोचला असून, सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे.यंदा हंगामात १६४४.८५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील सरासरी पावसापेक्षा कितीतरी अधिक पटीने अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे १०७५.७७ मि.मी. इतके असते. आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या परतीच्या पावसानेदेखील जिल्ह्यातील पावसाचे समीकरण बदलून टाकले आहे. साधारणपणे आॅक्टोबरमध्ये सरासरी ९३५ मि.मी. इतके पर्जन्यमान होत असते. परंतु यंदा केवळ २३ तारखेपर्यंत ११५२ मि.मी.पर्यंत पावसाचे प्रमाण पोहोचले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बरसलेल्या परतीच्या पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचेदेखील नुकसानझालेले आहे. हवामान खात्याने येत्या ३० तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला असून, पावसाची टक्केवारी अधिक वाढण्याची शक्यता आहे.बुधवारीदेखील जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. विशेषत: इगतपुरी, कळवण, निफाड, देवला या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र पावसानी नोंद झाली नाही. सायंकाळनंतर आभाळ कोळेकुट्ट झाल्याने रात्रीतून पाऊस पडण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.बुधवारी झालेले पावसाचे प्रमाणनाशिक (३.३.), इगतपुरी (३१.०), दिंडोरी (३.८), पेठ (३.०), त्र्यंबकेश्वर (०.०), मालेगाव (१०.०), नांदगाव (७.०), चांदवड (१९.०), कळवण (२१.०), बागलाण (१०.०), सुरगाणा (१.३), देवळा (३८.२), निफाड (६९.९), सिन्नर (४.०), येवला (२२.० मि.मी.) अशी पावसाची नोंद झालेली आहे.
परतीचा पाऊस आॅक्टोबरमध्येही अधिक; मुक्काम आणखी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:24 AM