सिन्नर तालुक्यात पावसाअभावी खरिपाची जळालेली पिके.
सिन्नर : पावसाळा अंतिम चरणात आला तरी वरुणराजा न बरसल्याने खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. वितभर वाढलेल्या व पाण्याअभावी करपून चालेल्या पिकाचा चारा होणेही शक्य नसल्याने पीक शेतात जळून जाण्यापेक्षा त्यात जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. वरुणराजाच्या अवकृपेमुळे बळीराजाला पावसाळ्यात दुष्काळाची अनुभूती येत आहे.सिन्नर तालुका तसा अवर्षणग्रस्तच, त्यातल्या त्यात पूर्व भाग दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. नदी व पाण्याचा स्रोत नसल्याने पूर्व भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतो. पावसाळ्यात बाजरी व कडधान्ये अशी पिके घेतली जातात. गेल्या चार वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. या खरिपाच्या पिकावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. यावर्षी पावसाच्या ओलीवर शेतकºयांनी खरिपाच्या पेरण्या केल्या; मात्र त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून पावसाने डोळे वटारल्याने शेतात उतरून पडलेले पीक जळून चालले आहे.पावसाळा अंतिम चरणात आला तरी पाऊस होत नसल्याने शेतकºयांनी पेरणी केलेले बाजरी, मका, सोयाबीन व कडधान्याची पिके कोमेजून गेली आहे. आज ना उद्या पाऊस होईल व किमान खरिपाचे पीक येऊन जनावरांपुरता चारा होईल, ही बळीराजाची भोळी आशा मावळल्यात जमा आहे. त्यामुळे शेतकºयांनी खरिपाच्या उतरून पडलेल्या पिकात जनावरांना चरण्यासाठी सोडल्याचे चित्र आहे. महागडी बियाणे पेरण्यासाठी शेतकºयांनी कर्ज काढले किंवा नातेवाइकांकडून हातउसने पैसे घेतले. याशिवाय शेतकºयांनी घेतलेले कष्टही वाया गेले आहे. पाऊस नसल्याने तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची परिस्थिती बिकट झाली आहे. आगामी महिनाभराच्या काळात पाऊस झाला तरी खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणे शक्य नाही. त्यामुळे आहे त्या उगवलेल्या पिकाचा जनावरांच्या चाºयासाठी आत्ताच उपयोग करून घेणे योग्य ठरणार आहे.जनवारांच्या चाºयाची परिस्थिती अवघड झाली आहे. सिन्नर तालुक्यातील शेतकºयांना अन्य तालुक्यांतून चारा विकत आणावा लागत आहे. खरिपाचे पीक गेले तरी जनावरांना वाचविणे महत्त्वाचे असल्याने शेतकरी मिळेल ते पर्याय निवडताना दिसत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आहे तर उर्वरित काळ कसा जाईल, याची विवंचना बळीराजासह प्रशासनाला लागून राहिली आहे.११ गावे व ५७ वाड्या-वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठापावसाळा संपत आला असला तरी तालुक्यात टॅँकरची मागणी वाढतच आहे. सध्या तालुक्यातील ११ गावे व ५७ वाड्या-वस्त्यांवर १३ टॅँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. निºहाळे-फत्तेपूर, खापराळे, फुलेनगर, पाटपिंपरी, सोनारी, बारागावपिंप्री, आडवाडी, पांगरी खुर्द, घोटेवाडी, पिंपळे, सायाळे, गुळवंच, फर्दापूर, जयप्रकाशनगर या गावांना व वाड्या-वस्त्यांना दहा खासगी व तीन शासकीय टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.रब्बीच्या हंगामाची शेतकºयांना चिंतासिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातच नव्हे तर तालुक्यात सर्वत्र खरिपाचे पीक वाया गेल्याचे चित्र आहे. तालुक्यात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. तीन महिने वाट पाहूनही पाऊस न झाल्याने सोयाबीनचे पीक जळून चालले आहे. खरीप हंगामातील पेरणी केलेली सर्वच पिके पावसाअभावी शेतात करपू लागली आहेत. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकºयांपुढे खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम कसा घ्यावा असा प्रश्न पडल्याने शेतकºयांपुढे चिंता वाढली आहे.