निऱ्हाळे : पाऊस लांबणीवर पडल्याने खरीप हंगामातील पेरणी झालेली पिकांची वाढ खुंटली होती, पण दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मघा नक्षत्राच्या दिवसभर चालणाऱ्या रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.
सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे-फत्तेपूर परिसरातील शेतकरी हैराण झाले होते. पाऊस न झाल्याने खरिपाची पिके उन्हाने वाळत होती आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. रोहिणी व मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मका, मूग अशी खरिपाची पिके शेतकरी वर्गाने पेरली. यंदा प्रथमच चांगला पाऊस पडेल असा हवामान खात्याने दिलेल्या अंदाज फोल ठरला. तब्बल वीस ते पंचवीस दिवसांपासून गायब असलेल्या पावसामुळे पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे खर्च वाया जातो की काय, अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू असताना गेल्या दोन दिवसांत मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता पिकांना जीवदान मिळाले आहे.