अलंगुण : आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मध्यम व हलक्या पावसाने तालुक्यात जोर धरला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य शेतीला पावसाने जीवदान दिले असून भात, नागली, वरई आदी प्रमुख पिकांची लागवड झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात सुरगाणा,पेठ, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी हे तालुके पावसाचे क्षेत्र म्हणून ओळखले जातात.असे असताना यावर्षी सुरगाणा तालुक्यात जूनपासून आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरवली.त्यामुळे पेरण्या झाल्या परंतु लागवडी लायक पाऊस नसल्याने भात, नागली, वरई आदी प्रमुख अन्नधान्य पिकांची लागवड अडचणीत सापडून दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संपूर्ण तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तालुका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. असे असतांना आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मध्यम व हलक्या पावसाने तालुक्यात जोर धरला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य शेतीला पावसाने जीवदान दिले असून भात, नागली, वरई आदी प्रमुख पिकांची लागवड झाली आहे. यामुळे एकीकडे बळीराजा सुखावला तर दुसरीकडे जाणकारांच्या मते, यावर्षी हलक्या पिकांच्या उशिरा लागवडीमुळे सालाबादप्रमाणे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. मागील पावसाळ्याच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कमी पाऊस झाला असून ओढे-ओहोळ, नदी आदी प्रमुख स्रोतांना पाणी वाहते. पण जोरदार पाऊस नसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली नाही.