लोकमत न्यूज नेटवर्क
संजीव धामणे,
नांदगाव : तालुक्यात यंदाच्या हंगामात ६३ हजार हेक्टर क्षेत्राखाली पिकांची पेरणी झालेली आहे. तालुक्यात सरासरी ४९१ मिलीमीटर पावसाची सरासरी आहे. आज अखेर १४० टक्के म्हणजे ६८८ मिलीमीटर पाऊस झालेला आहे यामुळे खरीप हंगामातील पीक परिस्थिती चांगली होती. परंतु गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
नांदगाव तालुक्यात कपाशी आणि कांदा ही मुख्य नगदी पिके आहेत. तसे बघितले तर मकादेखील नगदी पीक म्हणून शेतकरी घेत आहेत. मका पिकाखाली ३० हजार हेक्टर, कपाशी पिकाखाली ८ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.
नांदगाव तालुक्यात कांदा पीक खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात सात हजार हेक्टर क्षेत्रावर, रब्बी हंगामात म्हणजे रांगडा कांदा १३ हजार हेक्टरवर व उन्हाळी कांदा साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.
कृषी विभागाकडून कपाशी पिकासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन, ठिबक सिंचन, कीड रोग सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविला जातो. शेतकऱ्यांना कीड रोगाबद्दल मार्गदर्शन करून आर्थिक नुकसान पातळीच्यावर नुकसान झाल्यास त्याबाबत सल्ला दिला जातो.
कांदा पिकाबाबत कृषी विभागामार्फत ठिबक सिंचनाचा लाभ, तुषार सिंचनाचा लाभ व कांदा चाळ (कांदा साठवण गृह) याचा लाभ दिला जातो. ठिबक सिंचनासाठी एकरी पंधरा ते वीस हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळते. कांदा चाळसाठी ८७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते. कृषी विभागामार्फत लागवडीचे तंत्रज्ञान प्रचार, प्रसार करून शेतकऱ्यांना शिवारात मार्गदर्शन केले जाते.
विमाअंतर्गत सन २०२१ मध्ये १९ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे.
इन्फो
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
सध्या कपाशीचा बाजारभाव साडे पाच हजारांच्या दरम्यान तर कांदा पिकाचा बाजार भाव बाराशे रुपये क्विंटल या प्रमाणात आहे. शेतकरी स्वतः निर्यात करीत नाहीत. शेतकरी मार्केट कमिटी अथवा गावातील व्यापाऱ्याला विक्री करतो व त्यानंतर तो माल मोठ्या व्यापाऱ्यामार्फत निर्यातीसाठी पाठवला जातो. यंदा खरीप पिकाला अनुकूल स्थिती होती. परंतु गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.