नाशिक : मागील चार ते पाच दिवसांपासून सलग दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत असणाºया पावसाच्या हजेरीमुळे जणू नाशिककरांच्या दिवाळीच्या खरेदीवर पाणी फिरल्याचे बोलले जात होते. धनत्रयोदशीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना पावसाने उघडिप दिल्यामुळे नाशिकच्या बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे विक्रेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.नाशिकमधील रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, कॉलेजरोड, सराफ बाजार आदि परिसरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. व्यावसायिकांना दिवाळीचा हंगाम ‘कॅच’ करण्यासाठी पावसाचे मोठे आव्हान होते. पावसाने दिलेल्या उघडिप विक्रेत्यांसह नागरिकांच्या पथ्यावर पडली आहे. नागरिकांनाही दिवाळीच्या खरेदीसाठी जणू मुहूर्त लाभला आहे. रविवार हा खरेदीचा वार असल्याचे चित्र सकाळपासून बाजारात पहावयास मिळत आहे. महिलावर्गाची किराणा खरेदीसाठी गर्दी दिसून आली. फराळाच्या पदार्थांची महिलांची लगबग घरोघरी सुरू झाली असून फराळाचे पदार्थ तसेच त्यासाठी लागणारे साहित्य खरेदीकरिता नागरिकांची पावले आता बाजारपेठेकडे वळू लागली आहे.गेल्या सोमवारपासून नाशिकमध्ये ढगाळ हवामानासाह पावसाची हजेरी संध्याकाळची ठरलेली होती. यामुळे बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र होते. दुपारी तीन वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाऊस सुरू राहत होता. यामुळे सर्वत्र रस्ते जलमय होऊन ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांनी गैरसोय टाळण्याकारिता खरेदीसाठी बाहेर पडणे पसंत केले नाही. शनिवारीदेखील पावसाने दुपारी एक तासासाठी हजेरी लावली होती; मात्र रविवारी सकाळपासून शहरात कडक ऊन पडले असून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह परतला असून पावसामुळे उत्साहवर पाणी फिरले होते. विविध शोभेच्या वस्तू, डेकोरेशन, आकाशकंदिल विक्रेत्यांनी दुकानाबाहेर मांडले आहे. स्विट्सच्या दुकानाबाहेरही विविध ड्रायफू्रट, मिठाईचे आकर्षक पॅकिंगचे गिफ्ट पॅकचे डिस्प्ले बघावयास मिळत आहे. विक्रेत्यांनी दुकानांवर रोषणाई करण्यास सुरूवात केली आहे.
पावसाच्या उघडिपीने दिलासा; नाशिककरांची दिवाळी खरेदीसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 5:32 PM
पावसामुळे उत्साहवर पाणी फिरले होते. विविध शोभेच्या वस्तू, डेकोरेशन, आकाशकंदिल विक्रेत्यांनी दुकानाबाहेर मांडले आहे.
ठळक मुद्दे पावसाची हजेरी संध्याकाळची ठरलेली होती. यामुळे बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र होते.नागरिकांनी गैरसोय टाळण्याकारिता खरेदीसाठी बाहेर पडणे पसंत केले नाहीपावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण