नाशिक : आकाशात भरून आलेल्या कृष्णमेघांच्या कोसळण्याचे वर्णन करणारे ‘बरसे घटा घन घन’ हा मध्य लयीतील राग मेघमल्हार आणि ‘शून्य गढ शहर’ हे कुमार गंधर्वांचे निगुणी भजन सादर करून गंधार देशपांडे यांनी रसिकांना मुग्ध केले.निमित्त होते स्वरप्रभा संगीत विद्यालयाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्याचे. या कार्यक्रमात कला क्षेत्रात योगदान दिलेल्या मंगलप्रभा लोणकर, पंडित प्रभाकर दसककर, पंडित नाना मुळे, पंडित विजय हिंगणे, माधुरी ओक, कमलाकर वारे, विश्वनाथ ओक यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या संचालक नीला देशपांडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पंडित रामदादा देशपांडे यांचे शिष्य गंधार देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. गंधार यांनी त्यांच्या गायनाला ‘जिया मानत नाही’ या यमन रागातील विलंबित ख्यालाने सुरुवात केली. मध्य लयीन राग मेघमल्हार सादर करताना त्यांनी ‘गरजे घटा घन घन’ ही बंदिश सादर केली. पंडित राम देशपांडे यांनी रचलेली मिश्र ठुमरी ‘बरसे बदरिया’ सादर करून त्यांनी अखेरीस कुमार गंधर्व यांनी रचलेले ‘शून्य गढ प्रहर’ हे निर्गुणी भजन सादर केले. यासाठी त्यांना सुधांशू घारपुरे (संवादिनी), यती भागवत (तबला) यांनी साथसंगत केली. नीला देशपांडे आणि विश्वनाथ ओक यांनी मनोगत व्यक्त केले. सुनेत्रा महाजन यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
‘बरसे घटा घन घन’
By admin | Published: June 29, 2015 1:39 AM