लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : विविधमहामंडळाकडून बेरोजगारांना देण्यात आलेले कर्ज माफ करण्यात यावे, शहरातील २०११ पर्यंतच्या झोपडपट्ट्या अधिकृत म्हणून घोषित करण्यात याव्या आदि मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.रिपाइं आठवले गटाच्या वतीने विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर पक्ष निरीक्षक काकासाहेब खंबाळकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी उपायुक्त रघुनाथ गवांडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध महामंडळांकडून बेरोजगारांना देण्यात आलेले कर्ज माफ करण्यात यावे, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व विशेष करून रिपाइं कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल करण्यात येणारे खोटे गुन्हे त्वरित थांबवावेत, मनपा क्षेत्रातील २०११ पूर्वीच्या सर्व झोपडपट्ट्यांना अधिकृत म्हणून घोषित करण्यात येऊन नागरी सुविधा देण्यात याव्या. महावितरणने अवास्तव आकारलेले वीज बिल कमी करण्यात यावे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज बिनव्याजी देण्यात यावे, सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, नाशिकरोड पूर्व विभागात मुस्लीम समाजाला कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.निदर्शन आंदोलनात रिपाइं जिल्हा संपर्कप्रमुख सुनील वाघ, अमोल पगारे, दिलीप दासवाणी, सुनील कांबळे, पवन क्षीरसागर, विनोद जाधव, समीर शेख, दिनेश जाधव, अनिल गुजर, कलीम सय्यद, प्रमोद बागुल, चंद्रकांत भालेराव, भारत निकम आदि सहभागी झाले होते.
रिपाइंच्या वतीने तीव्र निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:42 AM