मालेगाव : राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात असंसदीय भाषेचा वापर केला आहे. उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांची माफी मागावी, अशी मागणी खासदार साक्षी महाराज यांनी करत उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या सुरात सूर मिसळला आहे. साक्षी महाराज गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि. २५) येथील महेशनगर भागात राहणाऱ्या समीर शेख यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी साक्षी महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
साक्षी महाराज यांनी म्हणाले, महाराष्ट्रात हा माझा पहिला दौरा नाही. नाशिक, मुंबई, त्र्यंबकेश्वर येथे आश्रम आहेत. मुंबईत माझे कायम येणे - जाणे असते. भारत हे विश्वातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र आहे. देशात सर्वधर्मीय व सर्व प्रांतीय लोकांना अटक ते कटक जाण्यापर्यंतचे अधिकार संविधानाने दिले आहेत. मात्र राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात असंसदीय भाषेचा प्रयोग केला आहे. त्यांनी माफी मागावी. वाराणसीतील प्रकार हा इतिहासातील तोडमोड करून सांगितला जात आहे. हिंदू-मुस्लीम समाजाला जोडणे गरजेचे आहे. मुस्लीम समाज भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला मानत आहे. हिंदू - मुस्लीम करून राजकारण करण्याचे दिवस आता गेले आहेत. राष्ट्रवाद, प्रेम व भाईचारा टिकवून ठेवल्यानेच देशाची प्रगती होईल. देश, राष्ट्र सर्वोच्च स्थानी असल्याचेही साक्षी महाराज यांनी सांगितले. यावेळी समीर शेख, मतीन खान, लकी गिल, दीपक भोसले, उमेश निकम आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
माजी आमदार आसीफ शेख यांचा विरोध
भाजपचे साक्षी महाराज मालेगावी आल्यानंतर माजी आमदार आसीफ शेख यांनी त्यांच्या या खासगी दौऱ्याला विरोध केला. शहरातील मुस्लीमबहुल भागात साक्षी महाराज यांचे येण्याचे कारण काय? पोलीस यंत्रणा माहिती घेण्यास कमी पडत आहे. साक्षी महाराजांचे येणे - जाणे वाढले आहे. काही षडयंत्र रचले जात आहे काय, याची तपासणी करून चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार शेख यांनी केली आहे.