नाशिक : शहरातील पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानात वनौषधी उद्यान साकारण्याचा निर्धार शहरातील सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी व्यक्त करून सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ लोटला; मात्र वनौषधी उद्यानाच्या कामाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. नाशिक शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले शहराचे आॅक्सिजन हब अर्थात नेहरू वनोद्यान. या वनोद्यानात हजारो प्रजातीचे लहान-मोठे वृक्ष आहेत. भारतीय प्रजातीची वृक्षसंपदा या ठिकाणी वनविभागाने जतन करून ठेवली आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून या उद्यानात कुठल्याही प्रकारे नैसर्गिक अधिवासाला धक्का न लावता वनौषधी उद्यान विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे यांनी या उद्यानाला आवर्जून भेट देत पाहणीही केली होती. पाहणीनंतर वनौषधी उद्यानाच्या कामाची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाही. केवळ वनोद्यानाच्या प्रवेशद्वाराचे नव्याने बांधकाम केले जात आहे. लोखंडी कमान काढून सीमेंट काँक्रीटच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. वनौषधी उद्यान साकारण्याबरोबरच नेहरू वनोद्यानाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न टाटा ट्रस्टकडून देण्यात येणार असल्याचे राज म्हणाले होते. राज ठाकरे यांनी यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांच्याकडून वनौषधी उद्यानाची परवानगी मिळविली होती. त्यानंतर नेहरू वनोद्यानाची जबाबदारी वनविभागाकडून वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली. या उद्यानामध्ये वनविभागामार्फत अनेक वनौषधी रोपांची लागवड करून ती वाढविण्यातही आली आहे. नक्षत्र वनाबरोबरच निसर्ग परिचय केंद्र, खुले रंगमंच, पॅगोडे, सभागृह, प्रसाधनगृह, बालोद्यान, बांबू वनाखाली ओटे बांधलेले आहेत.
राज ठाकरे यांच्या औषधी उद्यानाला मिळेना ‘मुहूर्त’
By admin | Published: September 28, 2016 12:31 AM