नाशिक : जिल्'ात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांना तातडीने सरकारी मदत देण्याची गरज आहे. मात्र मदत देताना नुकसानग्रस्त बागांचे पारदर्शकपणे पंचनामे व्हायला हवे, अन्यथा गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचणार नसून आलेला पैसा नेहमीप्रमाणे इतरांच्याच खिशात जाईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शहरातील गोदापार्कसह शिवाजी उद्यान व चिल्ड्रेन पार्कला भेट दिली. यावेळी गारपिटीमुळे जिल्'ातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत विचारले असता, त्यांनी सरकारी यंत्रणेवर निशाणा साधत पंचनामे पारदर्शकपणे होण्याची गरज असल्याचे सांगितले. अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारी स्तरावरून मदत दिली जाते. मात्र थातूर-मातूर नुकसान दाखवून पंचनामे केले जात असल्याने गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचत नाही. यावेळेसदेखील हा कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. कदाचित सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस जाहीर केले जातील, मात्र मदत त्यांच्यापर्यंत पोहचेलच याबाबत साशंकता आहे. नव्या सरकारची आता खऱ्या अर्थाने परीक्षा असून, त्यांच्या भूमिकेकडे आपले लक्ष असणार, असेही राज यांनी यावेळी सांगितले.
गारपीटग्रस्त बागांचे पंचनामे पारदर्शकपणे व्हावे राज ठाकरे : नव्या सरकारची परीक्षा
By admin | Published: December 14, 2014 12:50 AM