नाशिक - मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसऱ्याची तक्रार घेऊन येणारा महाराष्ट सैनिक नको तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभापुरता नाही तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरेला कारे’ उत्तर दिलेच पाहिजे, अशा परखड शब्दांत महाराष्ट नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पराभवाने खचलेल्या व मरगळलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी गंगापूररोडवरील चोपडा बॅक्वेट हॉल येथे आयोजित मेळाव्यात पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज यांनी सांगितले, मला कुणी भेटायला येत नाही परंतु, जे येतात ते फोटो काढण्यासाठी येतात. फोटो काढण्यापेक्षा मी जे सांगतो त्याचा विचार करा.असे काम करा, की तुमचे फोटो झळकले पाहिजेत. तुमच्या जागी राज ठाकरे आहे, असे समजून जबाबदारी पार पाडा. पक्ष स्थापनेच्यावेळी माझ्या पाठीमागे कोण होते? परंतु, शिवतीर्थावरील सभेला तुम्ही लोक आला नसता तर माझ्या आयुष्याचा सोक्षमोक्ष लागला असता. अगोदरचे दोर कापून टाकावे लागतात तेव्हा कुठे गड सर करता येतो, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. आज नाशिककरांना राज ठाकरे काय करत होता, याची जाणीव होत असेल. पुढची टर्म मिळाली असती तर महाराष्टत नाशिकचे वेगळेपण दिसले असते. राजकारणात पेशन्स आवश्यक आहे. लाटा येत असतात, अशावेळी आपण दीपस्तंभासारखे उभे राहायचे असते. फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे रेल्वेस्टेशन मोकळी झाली. जे सरकारला जमले नाही, ते आपण रस्त्यावर येऊन करुन दाखवले. पराभवाने खचून जाणारा मी माणूस नाही. यापुढे मनपाच्या भोंगळ कारभारावर तुटून पडा. आदेशाची वाट पाहू नका, असेही राज यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, प्रमोद पाटील, शहराध्यक्ष राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसेचे गटनेता सलीम शेख, डॉ. प्रदीप पवार, अनिल मटाले आदी उपस्थित होते.कुठे गेले नमोरुग्ण?राज यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडले. भाजपाची वर्षभरापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती बघा. कुठे गेले नमोरुग्ण? एक एसएमएस टाकला की ते तुटून पडत होते. आता सिलींडर, पेट्रोल महाग झाल्याने घरातूनच लाथा बसल्या. जे सांगितले त्याचे प्रत्यक्षात काय झाले? किती वेळ थापा मारणार, असे सांगत राज यांनी महापालिकेतील भोंगळ कारभारावर तुटून पडण्याचे आदेश दिले.
राज ठाकरे म्हणतात, मला मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 3:21 PM
नाशकात मनसेच्या पदाधिकाऱ्याना राज ठाकरे यांनी केले मार्गदर्शन
ठळक मुद्देदुसऱ्याची तक्रार घेऊन येणारा महाराष्ट सैनिक नको तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मला कुणी भेटायला येत नाही परंतु, जे येतात ते फोटो काढण्यासाठी येतात. फोटो काढण्यापेक्षा मी जे सांगतो त्याचा विचार करा.