नाशिक : सध्याचे राजकारण म्हणजे आळवावरचं पाणी झालं आहे. कोण कोणत्या पक्षात अन कोण कोणाबरोबर हेच समजत नाही. वरून दाखवायला वेगळे व आतून सर्व जण एकच असल्याचा टोला लगावत माझ्या हातात सत्ता द्या, मी भोंगे बंद करून दाखवतो असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू असेही ते म्हणाले. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेच्या अठराव्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त शनिवारी आयोजित सभेत ठाकरे यांनी आपल्या २८ मिनिटांच्या भाषणात सध्याच्या राजकारणावर प्रहार केला.
व्यासपीठावर पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, अभिजित पानसरे, अमित ठाकरे, संदीप देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सलिम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींसह पदाधिकारी उपस्थित हाेते. ते म्हणाले, जनसंघ म्हणजे आताचा भाजपा, शिवसेना व मनसे हेच खरे तीन पक्ष आहेत. राष्ट्रवादीला पक्ष म्हणणार नाही. कारण राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी आहे. शरद पवार हेच करत आले. त्यांना सोबत घेतात. दुसरीकडे गेले तरी ते निवडून येणारच असे सांगत ठाकरे म्हणाले, पक्षाच्या वर्धापनदिनाच्या १८ वर्षात चढ कमी पण उतारच जास्त पाहायला मिळाले. त्यात तुम्हा सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले. १८ वर्षात पक्षाने केलेली सर्व आंदोलने यशस्वी करून दाखविली. जरांगे पाटील यांनी मी तेव्हाच म्हटलो होतो, आरक्षणासाठी तांत्रिक अडचण आहे, अनेक मोर्चे निघाले. सरकारच्या भुल थापांना बळी पडू नका. खोट आश्वासने सरकार देत असल्याचे ठाकरे यांनी टिकास्त्र सोडले. सूत्रसंचलन पराग शिंत्रे यांनी केले.माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत...
सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी चांगलीच तोफ डागली. कोण कोणत्या पक्षात अन कोण कोणाबरोबर हेच समजत नाही. त्यामुळे माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत, इतरांची नाही. दुसऱ्याची पोरं आपल्या कड्यावर घेऊन खेळवायची मला हौस नाही असा टोला त्यांनी सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर लगावला.
महाराष्ट्र घडवायचाय...आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. जे जे काही शक्य असेल ते या महाराष्ट्रासाठी करूया. जातीपातीचं राजकारण करायचे नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीच्या लोकांना एकत्र आणले होते. त्यांचा आदर्श आजच्या राजकारण्यांनी घेण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.