नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्ताधारी असलेल्या नाशिक महापालिकेमार्फत गेल्या चार महिन्यांपासून शहरात ‘स्मार्ट सिटी’चा जागर सुरू असताना आणि गेल्याच आठवड्यात (दि. २) विशेष महासभेने करवाढ व ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेइकल) वगळता स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या विकासाला मंजुरी दिल्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना सदर योजना फसवी असल्याचा साक्षात्कार झाला आहे. राज यांनी मुंबईत बोलताना सदर योजना फसवी असल्याचे म्हटले असून केंद्र सरकारचा हा खेळ असल्याची टीका केली आहे. महापालिका प्रशासनाने शनिवारी (दि.५) सदर प्रस्ताव राज्य शासनाला सादर केल्यानंतर राज यांनी सदर विधान करत ‘वरातीमागून घोडे’ दामटल्याने मनसेच्या गोंधळी भूमिकेचा सिलसिला सुरूच आहे.केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियान अंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड झालेली आहे. त्यामध्ये नाशिक शहराचाही समावेश आहे. स्मार्ट सिटी अभियानाचा गवगवा गेल्या पाच-सहा महिन्यांपासून शहरात सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील तीनही पर्वणीकाळ आटोपल्यानंतर नाशिक महापालिकेने आपले संपूर्ण लक्ष ‘स्मार्ट सिटी’ अभियानाकडे वळविले. पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी १० जुलै २०१५ रोजी केंद्राला गुणांक तक्ताही सादर केला. त्यानंतर दि. १७ जुलै रोजी महासभा होऊन ‘स्मार्ट सिटी’च्या सहभागाबाबतच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली.
राज ठाकरे यांचे ‘वरातीमागून घोडे’
By admin | Published: December 09, 2015 11:51 PM