नाशिक (सुयोग जोशी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन शनिवारी (दि.९) दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडला. वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत घोषणा करतील किंवा काहीतरी वेगळी राजकीय भूमिका जाहीर करतील, अशी शक्यता राज्यभरातून आलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना होती. परंतु, ठाकरे यांनी लोकसभेबाबत कोणतीही भूमिका मांडली नाही. फक्त मला तुमच्याशी खूप बोलायचे आहे. पुढील भूमिका गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच दि. ९ एप्रिल रोजी मुंबई येथील शिवतीर्थावर मांडणार असल्याचे सांगत ‘राज’ कायम ठेवले.
लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाबाबत कोणताही निर्णय मनसे प्रमुखांनी न घेतल्याने पक्ष निवडणूक लढवणार की नाही, यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. वर्धापन दिन सोहळ्याच्या अगोदर म्हणजे अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे आल्यानंतर नक्कीच काही तरी घोषणा करतील ही आशा फोल ठरली आहे. भाजपकडून मनसेला काही प्रस्ताव येणार आहे का, त्यामुळे राज ठाकरे यांनी लोकसभा विषयाचा मुद्दा बाजूला ठेवला का, अशीही चर्चा नाशिककरांमध्ये रंगली आहे. काही दिवसांपासून भाजप मनसेला सोबत घेण्यासाठी सकारात्मक असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेे. ही चर्चा कुठपर्यंत जाते यावर आगामी भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.