देवळाली कॅम्प : शिवसेनेचे माजी खासदार आणि जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशुराम गोडसे यांच्यावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत दारणाकाठी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवळाली परिसरातील ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते.गोडसे यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने शुक्रवारी (दि.१८) त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव येथील एका रुग्णालयात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. सकाळी हजारो नागरिक शिवसैनिक यांच्यासह वैकुंठरथातून सकाळी अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्यात परिसरातील नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी दारणातीरावरील स्मशानभूमीत मुखाग्नी देण्यात आला. यावेळी सर्व पक्षांच्या मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी मविप्रचा आधारवड गेल्याचे म्हटले, तर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसेनेचा नेता अस्तास गेल्याचे म्हटले.यावेळी आमदार बाळासाहेब सानप, राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गिते, अॅड. नितीन ठाकरे, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर दशरथ पाटील, उदय सांगळे, दत्ता गायकवाड, माजी आमदार जयंत जाधव यांनी राजाभाऊंच्या कार्याला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. जगतगुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी लहवितकर यांनी निर्वाणी भजन व पसायदान म्हणून त्यांना अखेरचा निरोप दिला. अंत्ययात्रेस खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांच्यासह अन्य कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. देवळाली कॅम्प व्यापारी असोसिएशनच्या वतीने शहर परिसरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला होता.
राजाभाऊ गोडसे अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:41 AM