मनपाची महासभा मंगळवारी (दि. १९) महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्यानंतर नाशिक रोड येथील नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला आणि नाशिक रोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यावर काय कार्यवाही करणार, असा जाब विचारला. महापौरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर ज्या स्थायी समितीच्या सभागृहातून सभा संचालित करत होते तेथे जाऊन गोंधळ सुरू केला. सत्यभामा गाडेकर, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, सूर्यकांत लवटे, ज्योती खर्जुल यांच्यासह अन्य नगरसेवकांनी महापौरांना जाब विचारणे सुरू केले. काही वेळाने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्यासह अन्य नगरसेवक या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर गोंधळ आणखीनच वाढला. धोंगडे, दिवे, लवटे यांच्यासह काही नगरसेवकांनी महापौरांच्या पुढ्यात ठिय्या घातला. महापौरांचे काही ऐकून न घेता शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे महापौरांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतरही ‘उत्तर द्या, उत्तर द्या महापौर उत्तर द्या’ अशा घोषणा दिल्या. या गोंधळात महापौर गर्दीतून वाट काढून कसेबसे बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या टेबलावर ठेवलेला राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. या वेळी सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, मुकेश शहाणे या भाजपच्या नगरसेवकांनी तो घेऊ दिला नाही. भाजपचे सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेते जगदीश पाटील यांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेच्या वतीने गोंधळ सुरूच ठेवला. काही वेळाने हा गोंधळ थांबला.
इन्फो..
आज पाणी प्रश्नी तातडीची बैठक
नाशिक रोड येथील पाणी प्रश्नाची तातडीने दखल घेत महापौर सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी (दि.२०) सायंकाळी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तर या भागातील उपअभियंता अविनाश भोई यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याने त्या ठिकाणी शाखा अभियंता हेमंत दफ्तरे यांच्याकडे कार्यभार देण्याचे आदेश दिले आहेत.
इन्फो..
महापौरांनी आंदोलकांना सुनावले
गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना समजावण्याचा प्रयत्न महापौरांनी केला. परंतु ते ऐकण्याऐवजी अधिकच गोंधळ घालत असल्याने महापौरांनी कामकाज स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी उपाययोजनांची माहिती दिली. त्या वेळी सत्यभामा गाडेकर यांनी महापौरांचे अभिनंदन केले. आता अभिनंदन करता, मग अगोदर आंदोलन का केले, असा प्रश्न करीत त्यांनी गाडेकर यांना सुनावले. तर भाजपचेच संभाजी मोरूस्कर विरोधकांच्या सुरात सूर मिसळून टेंडर काढले, पण काम केव्हा हेाणार, असा प्रश्न करू लागल्यावर ते निविदेतच नमूद असते, असे महापौरांनी सांगून मेारूस्कर यांनाही सुनावले.