राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील नागरिकांकडे दोन लाख रुपयांच्या पुढे पाणीपट्टी थकल्याने ग्रामपंचायतीने नळ पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद केला आहे.पाणीपुरवठा बंद करण्याच्या पहिले ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात ग्रामसभेत ठराव करण्यात आला. ठरावाच्या प्रति गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. दोनशे-तीनशे लोकांकडे पाणीपट्टी थकबाकी असून, अवघे दहा टक्के वसूल झाला आहे. लाख रुपये खर्च दरवर्षी पाणीपुरवठा दुरु स्तीसाठी होत आहे.अनेकवेळा नागरिकांकडे पाणीपट्टीची मागणी करूनही पाणीपट्टी भरली जात नाही ही खेदाची बाब आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी महिलांना नागरिकांना भटकंती करण्याची वेळ येत आहे. लवकर पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी रामदास मंडलिक यांनी केले आहे.
पाणीपट्टी थकल्याने राजापूरचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 10:37 PM