नाशिक : गंगापूर धरणातून अखेरचे आवर्तन गोदापात्रात सुरू आहे. यामुळे गोदापात्र खळाळले आहे. गांधीतलावातही पाण्याची पातळी वाढली असून, तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी दुसऱ्या युवकाला गोदावरी नदीवरील आदिवासी जीवरक्षकांनी जीवदान दिले आहे. दोघे मित्र आंघोळीसाठी पाण्यात उतरले होते. यावेळी एकाने आरडाओरड केल्यामुळे आदिवासी जीवरक्षकांचे लक्ष वेधले गेले व त्यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवून गांधी तलावात सूर फेकला आणि बुडत्याला आधार देत सुखरूप बाहेर काढले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंचवटी गंगाघाट गोरेराम गल्ली येथे राहणारा लक्ष्मण सखाराम मीना(२८) व त्याचा मित्र रमेश मीना असे दोघेजण बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता गोदावरी नदीवरील गांधीतलाव येथे आंघोळीसाठी आले होते. तलावात हे दोघे आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही प्रवाहात वाहत जाऊन तलावात बुडू लागले. त्यावेळी रमेशने आरडाओरड केल्यानंतर परिसरात असलेल्या आदिवासी जीवरक्षक दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्यात उड्या घेऊन रमेशला सुखरूप बाहेर काढले. तर त्याच्यासोबत असलेला लक्ष्मण हा पाण्यात बुडाला. त्याच्या मृतदेहाचा अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला. मीना मूळचा राजस्थानचा असून, काही दिवसांपासून सराफ बाजारात एका सोनाराच्या दुकानात काम करत असल्याने दोघे गोरेराम गल्लीत राहात असल्याचे पोलिसांनी सांगितले. गांधीतलावात पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने लक्ष्मणचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.