नाशिक :- नाशिक शहरासह जिल्ह्यातील चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी पंचवटी ला पर्याय म्हणून सोयीची असलेली मनमाड- मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस नांदेडहून सोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना राज्यराणी गाडी नांदेडहून सुटणार असल्याचे दिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्ह्यातील प्रवाशी संतप्त झाले आहेत.राज्यराणी एक्सप्रेस ही जलद रेल्वेगाडी नाशिकसह जिल्ह्यातील प्रवाशी व मुंबई-नाशिक ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना सोयीची आहे. ही गाडी कधी भुसावळ तर कधी औरंगाबाद, नांदेड येथून सोडण्याविषयी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यापूर्वीही मनमाडहून सुटणारी मनमाड - पुणे एक्सप्रेस ही भुसावळला पळविली गेली तर तपोवन एक्सप्रेस नांदेडला पळविण्यात आली. आता राज्यराणी एक्सप्रेस नांदेडहून सोडण्याचा घाट नांदेडच्या खासदारांसह रेल्वे प्रशासनाने घातला आहे. यासंबंधीचे रेल्वेमंत्र्यांचे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. राज्यराणी एक्सप्रेस ही मनमाड ऐवजी हुजुर साहिब नांदेड येथून सोडण्याचा निर्णय झाला असल्याचे पत्र रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दिले आहे. हेच पत्र फिरत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. नांदेडहून नवीन गाडी सुरु करून राज्यराणी मनमाडमधूनच सोडावी अन्यथा प्रवाशी तीव्र विरोध करून जनआंदोलन करतील, असा इशारा प्रवाशी व रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटणारराज्यराणीसंबंधी व्हायरल झालेल्या पत्राबाबत मी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटणार असून नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. जर राज्यराणी नांदेड हुन सोडली जाणार असेल तर नाशिककरांसाठी दुसरी रेल्वे मनमाडहून सोडावी अशी मागणी करणार आहे.- डॉ. भारती पवार, खासदार