नाशिक जिल्ह्याच्या राजकारण व सहकार क्षेत्रात नेहमीच सिन्नरचा दबदबा राहिला आहे. मात्र जिल्हा परिषद स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या इतिहासात सिन्नरला एकदाही अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली नव्हती. शिवसेनेत असूनही शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार राजाभाऊ वाजे यांनी योग्यवेळी सर्वांना विश्वासात घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावल्याने सिन्नरला पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा लाल दिवा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर मिनी मंत्रालयाचा लाल दिवा कोणाला मिळतो यावर चर्चा सुरू झाली होती. तालुक्यातील शिवसेनेचे पाच सदस्य विजयी झाल्याने सिन्नरची दावेदारी प्रबळ होती. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील टाकेद गटातही शिवसेनेचा सदस्य विजयी झाल्याने राजाभाऊ वाजे यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढले होते. मात्र अध्यक्षपद मिळविण्यासाठी फारसे उतावीळ होऊन चालणार नव्हते. त्यात शिवसेनेने कॉँग्रेससोबत जावे की राष्ट्रवादी सोबत यावर काथ्याकुट चालला होता. शिवसेनेतही अध्यक्षपदासाठी अंतर्गत स्पर्धा होतीच. अध्यक्षपद सिन्नरला जाते की येवल्यात जाते याबाबत धाकधूक कायम होती. वाजे यांनी शेवटपर्यंत संयमी भूमिका ठेवून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम, योगेश घोलप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे व भाऊलाल तांबडे यांच्यासोबत ताळमेळ ठेवला. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडेही राजाभाऊ वाजे यांनी आपले वेगळेच वजन तयार करून ठेवले असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिन्नरच्या शीतल उदय सांगळे यांची दावेदारी प्रबळ होती. आमदार वाजे यांच्यामुळे ती आणखी वजनदार झाली. कितीही नाही म्हटले तरी सिन्नरच्या राजकारणाला जातीयवादाची झालर आहेच आहे. त्यामुळे सांगळे यांना लाल दिवा मिळवून देण्यासाठी आमदार वाजे यांची काय भूमिका राहील याच्या वेगवेगळ्या चर्चा व अफवा जाणूनबुजून पसरविल्या जात होत्या. त्यामुळे सांगळे यांना अध्यक्षपद मिळवून देण्याचे मोठे आव्हान वाजे यांच्यासमोर उभे राहिले होते. आमदार वाजे यांनीही ते आव्हान लीलया पार पाडले. सिन्नरला आत्तापर्यंत केवळ सभापतिपदयापूर्वी एन.एम. आव्हाड, निवृत्तीमामा डावरे, माणिकराव कोकाटे, मालती आव्हाड, डॉ. प्रतिभा गारे, अॅड. राजेंद्र चव्हाणके, राजेश नवाळे यांना जिल्हा परिषदेचे सभापतिपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. उपाध्यक्षपदही सिन्नरच्या वाट्याला आले नव्हते. शीतल सांगळे यांच्यारूपाने पहिल्यांदाच अध्यक्षपद सिन्नरला मिळाले. आमदार वाजे ठरले वरचढ !सिन्नरला सुरुवातीला दोन टर्म सूर्यभान तथा नानासाहेब गडाख आमदार होते. त्यानंतर तुकाराम दिघोळे तीनवेळा विधानसभेत गेले. त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी सलग तीनवेळा आमदारकी मिळवली व जिल्ह्णाच्या राजकारणात दबदबा ठेवला. मात्र आत्तापर्यंत सिन्नरला मिनी मंत्रालयाचा लाल दिवा मिळाला नव्हता. आमदार वाजे यांनी अडीच वर्षाच्या कालखंडात जिल्ह्याच्या राजकारणात वजन निर्माण करून सिन्नरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा लाल दिवा मिळवून आणण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. यात सांगळे कुटुंबीयांची मेहनतही महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. ...सावध पावले !गेल्या पाच वर्षापूर्वी उदय सांगळे यांनी चास गणातून पंचायत समितीची निवडणूक जिंकली होती. त्यावेळी राजाभाऊ वाजे गटाचे सहा सदस्य विजयी झाले होते. विरोधी कोकाटे गटाचेही सहा सदस्य विजयी झाले होते. त्यावेळी उदय सांगळे पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या शर्यतीत होते. मात्र ऐनवेळी एक सदस्य विरोधी पक्षात सहभागी झाल्याने उदय सांगळे यांना पंचायत समितीच्या सभापतिपदाने हुलकावणी दिली होती. पाच वर्षे विरोधी गटनेते म्हणून सांगळे यांनी काम केले. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत शीतल सांगळे यांना चास गटातून शिवसेनेचे उमेदवारी मिळाली. अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीतही पुन्हा हृदयाचे ठोके वाढावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या निवडणुकीत आलेला अनुभव पाठीशी असल्याने यावेळी सावध पावले टाकण्यात आली. यावेळी नशिबाने सात दिली आणि मिनी मंत्रालयाचा लाल दिवा सांगळे कुटुंबीयांना मिळाला.
राजाभाऊ वाजे ठरले ‘किंगमेकर’
By admin | Published: March 22, 2017 12:42 AM