ज्या शूर स्त्री - पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही स्मरण केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठिण आहे. राष्ट्रमाता ,राजमाता जिजामाता यांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागे हीच कृतज्ञतेची भावना आहे. राष्ट्रातील या महान राजमाता लोकमाता आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राखण्यास चांगले साधन आहे.
सूमारे चारशे वर्षापूर्वी जिजामातेंच्या रूपाने मातृतिर्थ सिंदखेडराजाला अशी एक शक्ती जन्माला आली की जीने दृष्टांचे निर्दालन आणि सृष्टांचे संरक्षण करण्याची प्रेरणा दिली. अन्याय,अत्याचार या विरूध्द लढण्याची जिद्द या महाराष्ट्र भूमीत निर्माण केली . माँ जिजाऊं चा जन्म ही भावी इतिहासाला कलाटणी देणारा ठरला त्यांच्यामुळेच जाधव व भोसले दोन मातब्बर घराणी एकत्र जोडली गेली .
जिजाऊ मॉ साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सुसंस्काराच्या बळावर छत्रपती शिवाजी राजांच्या रूपाने एक महान व्यक्तीत्व घडवले. असे व्यक्तीमत्व की ज्याला इतिहासात तोड नाही .राष्ट्रीयता ,स्वातंत्र्य ,स्वराज्य आणि सर्व धर्म समभावाचे बाळकडू त्यांनीच महाराजांना दिले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कर्तृत्वावर राजमाता जिजाऊंच्या शिकवणूकीचा ठसा उमटला होता. जिजामाता अत्यंत धाडसी ,संकटाला न घाबरता संकटांवर मात करणाऱ्या ,आपल्या ध्येया पासून तसूभरही मागे न हटणाऱ्या होत्या . शहाजी राजांसारख्या शूर - विर ,पराक्रमी ,साहसी स्वतंत्र राज्याची महत्वकांक्षा बाळगाणाऱ्या पुरूषाची पत्नी म्हणून त्यांचा लौकीक होताच पण त्याच बरोबर त्यांचा वैयक्तीक स्वतंत्र कतृत्वाचा लौकीक ही वाखाणण्याजोगा होता .
या संबंधात छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांचे जेष्ठ बंधू संभाजी यांची आई जिजाई संबंधी शहाजी राजांच्या दरबारातील कवी जयराम पिण्डे ' राधामाधवविलास चंपू" या आपल्या ग्रन्थात लिहतात की ,
जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई ।भली शोभली ज्यास जाया जिजाई I
जिचे किर्तिचा चंबू जंबूद्विपाला । करी साऊली ,माऊली मुलाला ॥ १३१॥
याचा भावार्थ असा की जिजाई ही शहाजी सारख्या स्वाभिमानी ,धाडसी ,उदार आणि पराक्रमी पुरूषाला चांगलीच साजण्याजोगी बायको होती. आणि ती केवळ नवऱ्याच्या किर्तीवर ओळखली जात नसून स्वतःच्या धिर ,उदार ,करारी ,गंभीर वृत्तीने त्यांची किर्ती त्या काळी सर्व भारत खंड भर पसरली होती ,इतकेच नव्हे तर त्यांच्या किर्तीच्या घूमटाच्या सावली खाली संपूर्ण जंबू द्विप म्हणजे जंबूद्विपातील सज्जन लोक यवनाच्या जुलमाला कंटाळून आश्रयाला येत असत .
असे जिजाऊ साहेबांना प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेल्या आणि शहाजी राजांच्या दरबारात वावरत असलेल्या कवी जयराम यांनी मोजक्या शब्दात जिजाऊंच्या कतृत्वाची महती सांगितली आहे. स्वतंत्र राज्य स्थापण्याची महत्वकांक्षा शहाजी राजे उराशी बाळगून होते पण तत्कालिन परिस्थिती स्वतंत्र राज्य स्थापनेला अनुकूल नसतांना देखील त्यांना एक नाही तर दोन वेळा सत्ता हस्तगत करण्याचा आणि स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी जिजाऊंनी पतीला पूर्ण सहकार्य केले .शेवटी शहाजी राजांनी जिजाऊंच्या संगनमताने स्वतंत्र राज्य स्थापन्याचा संकल्प केला.
एकुणच स्वतंत्र नेतृत्व करणारी , संकटाच्या वेळी शिवाजी राजांना धिर देणारी आणि मार्गदर्शन करणारी ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपरोक्ष स्वराज्याचे प्रशासन चोखपणे सांभाळणारी ,शिवाजी राजे मोगलाच्या कैदेत असतांना आणि त्यांच्या जिवीताला धोका असतांना सुध्दा मोगलांकडून किल्ला जिंकून घेणारी जिजामातेच्याप्रेरणेमूळेच शिवाजी राजांनी धाडशी कृत्य करून यश संपादन केले . जिजामातेने आपल्या कुटूंबाप्रमाणेच गोरगरीबांचे संसार थाटले . जिजाऊंच्या पायाशी सर्व सुखे लोळत असतांना त्याचा सर्वसामान्यप्रमाणे उपभोग न घेता स्वराज्याला जिवापाड जपले . आपल्या पतीची स्वतंत्र राज्य स्थापनेची महत्वकांक्षा आपल्या पुत्राच्या माध्यमातून पूर्ण केली . जिजाऊ ह्या राजमाता होत्या त्याच बरोबर त्यांना लोकमाता राष्ट्रमाता म्हणून लोकांनी गौरविले यातच त्यांची थोरवी सामावलेली आहे . अशा या थोर आणि वंदनीय लोकमाता ,राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण ,चिंतन आणि अनुकरण आज आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे.
- शिवमती माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष ,जिजाऊ ब्रिगेड