मनसेत शाखा अध्यक्षपदाला संघटनेत सर्वात महत्त्वाचे स्थान राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी घोषित केले. त्या अनुषंगाने गेल्या महिनाभरापासून शाखाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून स्पर्धाही वाढली आहे. पक्षाचे नेते अमित ठाकरे तसेच संदीप देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर नेत्यांनी दाेन ते तीन वेळा नाशिकमध्ये ठाण मांडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यंदाच्या दौऱ्यात राज ठाकरे हे शाखाध्यक्षांना थेट नियुक्तीपत्र देणार असून त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.
मंगळवारी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळासाहेब नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अनिल शिदोरे, किशोर शिंदे व योगेश खैरे यांनी राजगड येथे इच्छुकांशी संवाद साधला. या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.