नाशिक : ‘खोटं बोला पण रेटून बोला’ याची अनुभूती कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या झालेल्या जाहीरसभेच्या निमित्ताने नाशिककरांनी बुधवारी घेतली. सभेत राज यांनी केलेल्या बतावणीत नाशिकमध्ये मनसेने न केलेल्या विकासाचे दर्शन घडविल्याने नाशिककरांचे भरपेट मनोरंजन तर झालेच शिवाय केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सिंहस्थ निधीतून झालेल्या कामांचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाल्याने आश्चर्याचे भावही उमटले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. बुधवारी कल्याण येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीरसभा झाली. सभेत राज यांनी चित्रफीतीच्या माध्यमातून नाशिकमध्ये झालेल्या विकासाचे दर्शन घडविले आणि ३३ महिन्यांत जे नाशिकमध्ये होऊ शकले ते २० वर्षांत कल्याण-डोंबिवलीत का होऊ शकले नाही, असा सवाल केला. राज यांच्या जाहीरसभेचे थेट प्रक्षेपण वाहिन्यांवर सुरू असताना त्यांनी नाशिकमधील विकासाबाबत घेतलेल्या श्रेयाने आणि मनसेने आपल्या सत्ताकाळात न केलेल्या कामांचेही दर्शन घडविल्याने नाशिककरांचे मनोरंजन झाले. राज यांनी चित्रफीतीत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सिंहस्थ निधीतून उभारलेल्या पूल आणि रस्त्यांच्या कामांचेही श्रेय उपटले. मात्र, श्रेय घेताना त्यांना धडपणे कोणते रस्ते आणि कोणते पूल याची इत्यंभूत माहिती देता न आल्याने सारवासारव करण्याची वेळ त्यांच्यावर आली. मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या निविदा प्रक्रियेचा घोळ मिटून अवघे दहा-पंधरा दिवस लोटले असताना राज यांनी सदर प्रकल्पाचे टेंडर निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाल्याचे ठोकून दिले. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात मुंबई-आग्रा महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखालील सर्व्हिसरोडही महापालिकेनेच केल्याची बतावणीही राज यांनी केली. वस्तुत: उड्डाणपुलाच्या बांधकामावेळी समांतर रस्त्यांचा वापर केला म्हणून उलट महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे सुमारे १९५ कोटी रुपयांची मागणी केली होती. भुजबळ यांनीच उड्डाणपुलाच्या बांधकामाबरोबरच समांतर रस्त्यांचेही काम करून देण्यात पुढाकार घेतला होता. भुजबळ फाउण्डेशनने ठिकठिकाणी उद्यानांमध्ये उभारलेल्या ग्रीन जिमचेही राज यांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या स्मार्ट नाशिक अभियानाच्या प्रक्रियेत नाशिक अद्याप पूर्णपणे उत्तीर्ण झालेले नसताना आणि महापौर-आयुक्त बोस्टन दौऱ्यातून सायकल शेअरिंगची माहिती घेऊन येईपर्यंत वाट न पाहता राज यांनी त्यातील सायकल शेअरिंग, सायकल ट्रॅक यासारखे प्रस्तावित प्रकल्प महापालिका राबविणार असल्याचे जाहीरही करून टाकले. नाशिकमध्ये मनसेने न केलेल्या कामांच्या श्रेयवादाची ही बतावणी नाशिककरांसाठी चांगलीच रंजक ठरली.
कल्याणच्या सभेत राज यांची ‘बतावणी’
By admin | Published: October 28, 2015 11:31 PM