नाशिक : कोरोना निर्बंधांतून शिथिलता मिळाल्यानंतर रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत सकाळपासून खरेदीचा उत्साह दिसून आला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, मेन रोड येथे खरेदीसाठी महिलावर्गाची गर्दी झाली होती. मिठाईच्या दुकानातदेखील विशेष गर्दी झाल्याने सर्वत्र खरेदीचा उत्साह दिसून आला.
यंदा काहीशा कटू आठवणींनी रक्षाबंधनाचा सण आला असला तरी उत्साहदेखील दिसून आला. मेळा, नवीन सीबीएस तसेच नाशिक रोड बसस्थानकावर माहेरी निघालेल्या लेकी-सुनांची गर्दी झाली होती. कोरोनाचे निर्बंध काहीसे शिथिल झाल्यामुळे सणासाठी लोक बाहेर पडल्याचे प्रकर्षाने जाणवले. भेटवस्तूंच्या दुकानांमध्येदेखील सकाळपासूनच गर्दी झाली होती.
नाशिक रोड येथील देवी चौक, सिडकोतील पवननगर, शिवाजी चौक, पंचवटीतील रविवार कारंजा, मेन रोड, या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त भरलेल्या बाजारात मोठी गर्दी झाली होती. यंदा मोठ्या राख्यांपेक्षा गोंड्यांच्या राख्यांना मागणी अधिक असल्याने नानाविध प्रकारच्या गोंड्यांच्या राख्याकडे खरेदीचा कल दिसून आला.