नाशिक : शहर वाहतुक पोलिसांकडून नाशकातील सर्वसामान्य नागरिक तसेच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांना विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडावे लागत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्यावतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांची दंडुकेशाही अशीच सुरू राहिली तर शहरात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मोर्चेक-यांनी दिला आहे.या संदर्भात सकाळी शहरातील बी.डी. भालेकर मैदानापासून मोर्चा काढण्यात आला. शालीमार चौक, शिवाजीरोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मध्यवर्ती बस स्थानक चौकातून मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्या म्हटले आहे की, शहरात वाहन तपासणीच्या नावाखालीा रस्त्याच्या मध्यभागीच खाकी पोलीस तसेच वाहतूक पोलीस आडवे येत आहेत, कागदपत्र तपासणीसाठी मानसिक व आर्थिक छळ करीत आहेत, घाणेरड्या भाषेत शिावीगाळ करणे, अरेरावी करणे, सक्तीने दंडाची वसुली असे प्रकार घडत आहेत. पोलीस निरीक्षक काळे, कदम, हवालदार परदेशी हे अधिकारी प्रामुख्याने नागरिकांना त्रास देत असुन टार्गेट पुर्ण करण्यासाठी हे सारे प्रकार करावे लागत असल्याचे नागरिकांना सांगत आहेत. न्यायालयाची दिशाभुल करून रिक्षा व टॅक्सी चालकांवर खोट्या केसेस केल्या जात आहेत, जाब विचारणा-या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांची अशीच दडपशाही सुरू राहिल्यास अराजकता माजण्यास वेळ लागणार नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शहरात रिक्षा, टॅक्सी थांब्याचे फलक लावावेत, वाहन पार्किंग, नो पार्किंग झोनचे फलक लावावे, थांब्यांचे तात्काळ सर्व्हेक्षण करावे, शहरातील ६८६ रिक्षा आरटीओने अडकून ठेवल्या आहेत, त्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे.या मोर्चात शिवसेनेचे शिवाजी भोर, रिपाईचे शशीकांत उन्हवणे, मनसेचे भय्या मनियार, भाजपाचे भगवंत पाठक, हैदर सय्यद यांच्यासह सखाराम गोपाळ, मुरली घोरपडे, मामा राजवाडे, नितीन पवार यांच्यासह शेकडो वाहनचालक सहभागी झाले होते.
नाशकात पोलिसांच्या जाचक त्रासाविरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 2:53 PM
शहरात वाहन तपासणीच्या नावाखालीा रस्त्याच्या मध्यभागीच खाकी पोलीस तसेच वाहतूक पोलीस आडवे येत आहेत, कागदपत्र तपासणीसाठी मानसिक व आर्थिक छळ करीत आहेत
ठळक मुद्दे सर्वपक्षीय कृती समिती : अराजकता माजण्याचा इशारा न्यायालयाची दिशाभुल करून रिक्षा व टॅक्सी चालकांवर खोट्या केसेस केल्या जात आहेत