नाशिक : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून लाखो समाज बांधव २४ जानेवारीस कार व मोटारसायकल रॅलीने पुणे जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड येथून सहभागी होणार असल्याची माहिती मराठा नेते सुनील बागुल, चंद्रकांत बनकर, विलास पांगरकर, करण गायकर, शिवाजी सहाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व आंदोलक समर्थक २४ रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जमल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना न होता पुण्याच्या दिशेने रवाना होतील. त्याच दिवशी साधारणपणे दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पिंपरी चिंचवड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करून त्या आंदोलन मोर्चात सहभागी होतील व त्यानंतर जरांगे पाटील यांच्यासह इतर समाज बांधव लोणावळा मार्गे मुंबईकडे रवाना होतील. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून अंदाजे प्रत्येकी एक ट्रक याप्रमाणे तांदूळ, डाळ, तेल, शेंगदाणे व मसाल्याचे पदार्थ याप्रमाणे साहित्य स्वयंस्फूर्तीने जमा केले आहे.
ते सर्व साहित्य मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी येणाऱ्या समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ज्या तालुक्यातून ते साहित्य जमा झाले आहे त्या तालुक्यातील समाज बांधवांनी त्यांची एक समिती निर्माण करून ते सर्व साहित्य ट्रकमध्ये भरून आंदोलन स्थळापर्यंत नेण्याची व त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करणाऱ्या समाज बांधवांना ते सोपवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. पत्रकार परिषदेसाठी नानासाहेब बच्छाव, आशिष हिरे, राम पाटील, योगेश गांगुर्डे, नवनाथ कांडेकर, योगेश नाटकर, ज्ञानेश्वर कवडे, निलेश ठुबे, बाबासाहेब जोगदंड, शुभम देशमुख, एकता खैरे, स्वाती जाधव, मनीषा जाधव, हर्षल पवार, शरद लोणकर, ज्ञानेश्वर सुराशे ,ईशान गोवर्धने ,सागर वाबळे, नाना पालखेडे, संदीप बरे, राहुल काकळीज उपस्थित होते.