सिन्नर : जीवन विमा व बचत आजच्या जीवनातील अनिवार्य व आवश्यक बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर टपाल कार्यालयाने डुबेरे येथील रोजगार हमी योजनेवरील मजुरांसाठी खास विमा मेळाव्याचे आयोजन केले होते.तालुका पोस्टमास्तर आर. व्ही. परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली व विमा क्षेत्रीय अधिकारी अमोल गवांदे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यामध्ये सर्व मजुरांना ग्रामीण टपाल जीवन विमा, तसेच सुरक्षा विमा योजना यासंबंधी माहिती देण्यात आली व सर्व मजुरांचा विमा उतरविण्यात आला.भारतीय टपाल खात्याची विमा पॉलिसी सर्वांत जुनी मानली जाते. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेली ही योजना २४ मार्च १९९५ पासून ग्रामीण जनतेसाठी खुली करण्यात आल्याची माहिती विमा क्षेत्रीय अधिकारी अमोल गवांदे यांनी दिली. इतर विमा कंपन्यांपेक्षा कमी हप्ता व अधिक बोनस यामुळे ग्रामीण भागातील लोक डाक विभागाच्या पॉलिसीला अधिक पसंती देत असल्याचे गवांदे यांनी सांगितले. यामध्ये संपूर्ण जीवन विमा, मुदतीचा विमा (ग्राम संतोष), परिवर्तनीय संपूर्ण विमा (ग्राम सुविधा), प्रत्याशित मुदतीचा विमा (ग्राम सुमंगल), मुलांचा विमा या योजनांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. यात मुदतीच्या विम्यास सर्वांनीच पसंती दिली असून, विशेष म्हणजे यामधील गुंतवणूक प्राप्तिकर सवलतीस लागू असल्याचे ते म्हणाले. या योजनेमध्ये ग्रामीण जनतेने सहभागी होण्याचे आवाहन परदेशी व गवांदे यांनी यावेळी केले.बाळासाहेब दराडे यांनी सूत्रसंचालन केले. बाळू गोफणे यांनी आभार मानले. समाधान एखंडे, मनोज नांदूरकर, गणेश जगताप, मिलिंद सोनवणे, प्रशांत लोळगे, एकनाथ बेदाडे यांनी मेळावा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
डुबेरेत रोहयोवरील मजुरांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:10 AM