नाशिक- अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर साकारल्यानंतर प्रत्येकाला या मंदिराला भेट देऊन श्री रामाच्या दर्शनाची आस लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक भाजपाच्या वतीने सुमारे दीड हजार भाविकांना विशेष रेल्वे बोगीने अयोध्याकडे पाठवण्यात आले आहे.
मध्यरात्री दोन वाजता ही विशेष रेल्वे नाशिक रोड रेल्वे स्थानकातून रवाना झाली यावेळी सियावर रामचंद्र की जय जय,जय श्रीराम अशा घोषणांनी रेल्वे स्थानक दुमदुमून गेले होते अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर भाविकांना श्री राम लल्ला चे दर्शन घ्यायचे आहे मात्र सध्या प्रचंड गर्दी आहे मात्र आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने राम भक्तांना अयोध्या वारी घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहराच्या विविध भागातील दीड हजार भाविकांना अयोध्येला नेण्यात आले आहे.
आमदार राहुल ढिकले आणि उत्तमराव उगले या रेल्वे बोगीचे प्रमुख असून भाविकांना निरोप देताना नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हे भाविक आज रात्री अकरा वाजेच्या सुमारास अयोध्येला पोहोचणार असून उद्या दिवसभर अयोध्येत विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घडवण्यात येईल. त्यानंतर 16 फेब्रुवारीला त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.