नाशिक : नाशिकचे आराध्य दैवत असलेल्या काळाराम मंदिरात यंदादेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामनवमी साधेपणाने साजरी करण्यात आली. यंदादेखील कोरोनाच्या निर्बंधांमुळे भाविकांसाठी दर्शन बंद होते. मात्र, काळाराम मंदिराच्या पुजारीवर्गाच्या उपस्थितीत आणि यंदाचे मानकरी विलासबुवा पुजारी यांच्या कुटुंबाच्या उपस्थितीत हा सोहळा साधेपणाने पार पडला.
ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला गत मंगळवारच्या गुढीपाडव्यापासूनच सुरुवात झाली होती. निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा आणि धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ करण्यात आला. माध्यान्ही दुपारी १२ वाजता रामजन्माचा पाळणा गात पुष्पवर्षाव करत ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष करण्यात आला. काळाराम मंदिरातील ही परंपरा शेकडो वर्षे सुरू असून सर्व धार्मिक विधी यंदादेखील पार पाडण्यात आले. मात्र, कोरोनामुळे जनसामान्यांना प्रवेश बंदी असल्याने सामान्य भक्तांविनाच सलग दुसऱ्या वर्षी रामनवमी पार पडली. दरम्यान रथयात्रेचा सोहळादेखील मंदिराच्या परिघातच शुक्रवारी अर्थात कामदा एकादशीला औपचारिक पद्धतीने पार पाडला जाणार आहे.