नाशिक : प्रांगणात रंगलेले रामजन्माचे कीर्तन...मंदिरात फुंकले जाणारे शंख...ताशा, झांजसह तालवाद्यांचा गजर...अन् काळाराम मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसरात जमलेल्या भाविकांच्या जनसमुदायाने उच्चस्वरात केलेला ‘राम-सीता, राम-सीता’चा जयघोष आणि ‘सियावर रामचंद्र की जय’चा गजर. अशा भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात प्रभू श्रीरामजन्माचा सोहळा तब्बल २ वर्षांनंतर काळाराम मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडला.
कोरोनाच्या दोन भयप्रद वर्षांनंतर काळाराम मंदिरात पुन्हा एकदा रामनवमीचा जल्लोष जनसामान्यांच्या उपस्थितीत पार पडला. तब्बल दोन वर्षांनंतर काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव पारंपरिक उत्साहात होत असल्याने भाविकांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला होता. पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात दर्शनासाठी रीघ लागली होती. जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिराच्या आत आणि बाहेर फुलांनी आकर्षकपणे संपूर्ण मंदिर सजविण्यात आले होते. शिस्तबद्धपणे लागलेली दर्शनाची रांग थेट मंदिराबाहेरील रस्त्यापर्यंत पोहोचली होती. रामजन्माची वेळ साधण्यासाठी सकाळी १० ते १०.३० दरम्यान रांगेत उभ्या राहिलेल्या भाविकांना दुपारचा रामजन्मोत्सवाचा सोहळा गाभाऱ्यातून अनुभवता आला. दुपारी १२ वाजेच्या रामजन्मोत्सवासाठी ताशे-तालवाद्यांनी साडेअकरापासूनच ताल धरल्यावर भाविकांची उत्सुकतादेखील शिगेला पोहोचली. अखेर ११ वाजून ५८ मिनिटांनी रामजन्मासाठी काही क्षण गर्भगृह पडदा सरकवून बंद झाले अन् अवघ्या दाेन मिनिटांच्या शांततेनंतर पडदा उघडताच ‘राम सीता, राम सीता, सियावर रामचंद्र की जय’चा जयघोष आणि हात उंचावून भाविकांनी केलेल्या जल्लोषाने संपूर्ण परिसर रामनामाने दुमदुमून गेला. यंदाच्या वर्षाचे मानकरी देवेंद्रबुवा पुजारी यांच्या हस्ते हा रामजन्माचा सोहळा पार पडला.
इन्फो
राज्यपालांच्या हस्ते पूजन
सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे मनोभावे दर्शन घेतले. संस्थानच्या विश्वस्तांकडून त्यांना रामाच्या वास्तव्याने पुनीत भूमीसह काळाराम मंदिराबाबतची आख्यायिका सविस्तरपणे सांगितली. त्यांनी काळारामाचे साग्रसंगीत पूजन केल्यानंतर विश्वस्त मंडळातर्फे राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.