पंचवटी : सियावर रामचंद्र की जय हो, जय सीता राम सीता असा जयघोष करून पुष्प सुमनांची व गुलालाची उधळण करीत ढोल-ताशे व टाळ-मृदंगांच्या गजरात रविवारी (दि.२५) शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिरात रामनवमी (रामजन्मोत्सव) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात रामाची मूर्ती ठेवण्यात आली होती. रामनवमीनिमित्ताने शेकडो भाविकांनी रामनामाचा जप करून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. नाशिकचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळा राम मंदिरात रामजन्मोत्सवाचा उत्साह गेल्या काही दिवसांपासून होताच, रविवारी हा उत्साह शिगेला पोहोचला. विशेषत: मंदिरात जन्मो त्सवाची घटिका जवळ येत असताना ढोल-ताशा आणि शंख ध्वनीमध्ये रामनामाचा जयघोष करणाºया भक्तांचा उत्साह दुणावला होता. दुपारी १२ वाजेचा तो जन्मोत्सवाचा क्षण जवळ आला आणि उत्साह अधिक वाढला त्यानंतर श्रीरामांच्या जयघोषात पुष्प, गुलालाची उधळ करीत हा क्षण साजरा करण्यात आला. यावेळी राममंदिराच्या आवारात महिलांनी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात रामाची प्रतिमा ठेवून राम जन्माला ग सखे, राम जन्मला असे गीत सादर केले. सायंकाळी देवाला विविध ५६ प्रकारच्या पदार्थांपासून तयार केलेला अन्नकुटाचा नैवेद्य दाखविण्यात आला. राम-जन्मोत्सवानिमित्ताने मंदिराच्या आवारात भजनी मंडळांचा भजनांचा कार्यक्रमही संपन्न झाला.तत्पूर्वी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे काकडा आरती व त्यानंतर सकाळी ७ वाजता यंदाचे उत्सवाचे मानकरी पुष्कराजबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते श्रीं ची विधीवत पूजा करण्यात आली.रात्री उशिरापर्यंत गर्दीरामजन्मोत्सवासाठी सकाळी सुरू झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. त्यादृष्टीने विश्वस्त आणि पोलीस यंत्रणेने नियोजन केले होते. मंदिरात येणाºया भाविकांची संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन दर्शनाला येणाºया भाविकांना पूर्व दरवाजाने प्रवेश देऊन दक्षिण व उत्तर दरवाजाने बाहेर जाण्याची सोय करण्यात आली होती. भाविकांना उन्हापासून बचाव करता यावा यासाठी मंदिरातील काही दगडांवर पांढºया रंगाचे पट्टे मारण्यात आले होते. संस्थानच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटप केला जात होता, तर पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण काळाराम मंदिर व परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मंदिराकडे येणाºया रस्त्यावर वाहनांना बंदी घालून लोखंडी जाळ्या उभारण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे भाविकांना दर्शन सुखकर झाले.
राम जन्मला गं सखे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:51 AM