______
नाशिक : इस्लामी कालगणनेतील उर्दू महिना शाबानची सोमवारी २९ तारीख असल्याने चंद्रदर्शनाची श्यक्यता वर्तविली जात होती; मात्र कोठेही चंद्रदर्शन न घडल्याने या उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करत बुधवारपासून नववा उर्दू महिना ''रमजानुल मुबारक'' अर्थातच रमजान पर्वला प्रारंभ होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही रमजानवर कोरोनाचे सावट आहे.
_
मुस्लीम बांधव आज मंगळवारी रात्री ईशाची नमाज अदा केल्यानंतर त्वरित पारंपरिक प्रथेनुसार रमजान काळातील ''तरावीह''चे नियमित नमाजपठण करतील. बुधवारी (दि.१४) पहाट उजाडण्यापूर्वी समाजबांधव अल्पोपहार घेत ''सहेरी''चा विधी पार पाडून रमजानचा पहिला निर्जली उपवास (रोजा) ठेवतील. हा पहिला उपवास बुधवारी पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटाला संपेल. म्हणजेच यंदाही महिनाभर कडक उन्हाळ्यात मुस्लीम बांधव १४ तासांचा प्रत्येक उपवास करणार आहेत.
सालाबादप्रमाणे रमजान पर्व साजरा करण्याचा उत्साह समाजबांधवांमध्ये सोमवारी दिसून आला. मागील वर्षीही कोरोनामुळे शासनाच्या आदेशाचे पालन करत सर्व मशिदी ऐन रमजानच्या काळातसुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी आपापल्या घरीच राहून पाचही वेळांचे तसेच ''तरावीह''च्या विशेष नमाजचे पठण करण्यावर भर दिला होता. यंदाही धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे मागील अधिसूचनेपासूनच मशिदींमध्ये केवळ मोजक्याच प्रमुख लोकांकडून नमाज पठण होत आहे. यामुळे समाजबांधवांचा काहीसा हिरमोड झाला आहे. शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करत समाजबांधवांनी रमजान पर्व साजरा करावा, असे आवाहन शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे.
-----इन्फो-----
फळबाजाराला सूट द्यावी
सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील जुने नाशिकमधील दूध बाजारात दुपारी ४ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत भरणाऱ्या रमजान काळातील फळबाजाराला सूट देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या बाजारात उपवास सोडण्याकरिता लागणारी फळे, खाद्यपदार्थ खरेदी केली जाते आणि प्रत्येक येणारी व्यक्ती आटोपशीर खरेदी करून उपवास सोडण्याच्या वेळेपूर्वी बाजारातून बाहेर पडते किंबहुना सर्वांचाच हाच प्रयत्न असतो. बाजारात येणाऱ्या प्रत्येकासाठी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य करण्यात यावे आणि प्रशासनाने बाजाराला परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे