नाशिक : मुस्लीमबांधवांचा पवित्र महिना रमजानचे सोळा उपवास (रोजे) पूर्ण झाले असून, अखेरचे चौदा दिवस शिल्लक राहिल्याने समुदायाला रमजान ईदचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे.इस्लामी संस्कृतीचा महान सण म्हणून ओळखल्या जाणारा रमजान ईदने रमजान पर्वाची सांगता होते. दरवर्षी मुस्लीमबांधव इस्लामी कालगणनेतील दहावा महिना ‘शव्वाल’च्या एक तारखेला रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र साजरी करतात. या दिवशी सामूहिकरीत्या विशेष नमाजचे सकाळी मुस्लीमबांधवांकडून पठण केले जाते. यावर्षी दिनदर्शिकेमध्ये ६ जुलै रोजी रमजान ईद दाखविण्यात आली आहे; मात्र ईद साजरी करण्याविषयीची अधिकृत घोषणा चालू रमजान महिन्याच्या २९ तारखेला संध्याकाळी होणार आहे. कारण चंद्रदर्शनावर पुढील उर्दू महिन्याची सुरुवात अवलंबून असल्यामुळे ५ जुलै रोजी संध्याकाळी विभागीय चांद समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे.रमजान पर्वाचे पंधरा उपवास राहिल्याने मुस्लीमबांधवांकडून अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेकरिता दिला जात आहे. रमजान पर्वकाळात प्रत्येक पुण्यकर्माच्या तुलनेत सत्तर पटीने अधिक मोबदला मिळतो, अशी धारणा आहे. मुस्लीमबांधव कुराणपठण, नमाजपठणाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे सर्वच मशिदींमध्ये गर्दी होत असून, बैठकव्यवस्थाही वाढविण्यात आली आहे. रात्री पठण केल्या जाणाऱ्या ‘तरावीह’च्या नमाजलाही समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. (प्रतिनिधी)
मुस्लीम बांधवांना रमजान ईदचे वेध
By admin | Published: June 22, 2016 11:56 PM