लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : रमजान पर्वच्या ३० तारखेच्या संध्येला रविवारी (दि.२५) शहरातील काही उपनगरांमध्ये ढगाळ हवामान काही वेळ कमी झाल्यामुळे चंद्रदर्शन घडले. वडाळागावातील काही प्रत्यक्षदर्शींनी चंद्र बघितल्याची ग्वाही जुने नाशिकमधील शाही मशिदीत धर्मगुरूंच्या बैठकीत दिली. त्यानंतर रमजान ईदच्या सामूहिक नमाजपठण सोमवारी (दि.२६) शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता होणार असल्याची घोषणा करण्यात आली. इस्लामी कालगणनेच्या नववा उर्दू महिना रमजानची रविवारी संध्याकाळी ३० तारीख होती. त्यामुळे चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. शहरासह जिल्ह्यातील चांदवड, येवला आदि भागांमध्येही चंद्रदर्शन घडल्याची माहिती विभागीय चांद समितीला प्राप्त झाली. तसेच काही वेळेतच वडाळागाव, विहितगाव, देवळाली कॅम्प आदि उपनगरांमध्येही चंद्रदर्शन घडल्याची खात्रिशीर माहिती समजल्यानंतर संबंधित प्रत्यक्षदर्शींची माहिती घेऊन त्यांना तत्काळ मशिदीमध्ये सुरू असलेल्या बैठकीसाठी बोलविण्यात आले. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मौलाना महेबूब आलम, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही, मौलाना मुफ्ती आसीफ इकबाल यांच्या उपस्थितीत वडाळागावातील प्रत्यक्ष चंद्रदर्शन घेतलेले हाफीज अब्दुल मजीद, मौलाना इरफान रजा, कारी अझीम खान, अल्तमश शेख आदिंनी चंद्रदर्शन स्पष्टपणे बघितल्याची ग्वाही दिली. तसेच नोंदवहीमध्ये चंद्रदर्शनाच्या मजकुरापुढे स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर सय्यद हाजी मीर मुख्तार अशरफी यांनी उपस्थित धर्मगुरू व खतीब यांच्या परवानगीने अधिकृतरीत्या चंद्रदर्शनाची ग्वाही प्राप्त झाल्याचे जाहीर केले. उपस्थित सर्व समाजबांधवांनी एकमेकांना ‘चांद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. तत्काळ शाही मशिदीच्या मुख्य ध्वनिक्षेपकावरून चंद्रदर्शन घडल्याची माहिती देत रमजान ईदचे सामूहिक नमाजपठण सकाळी १० वाजता शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रमजान पर्वला निरोपमहिनाभरापासून रमजान पर्व सुरू होते. या कालावधीत मुस्लीम समुदायाची संपूर्ण दिनचर्या बदललेली पहावयास मिळत होती. संयम, सदाचार व मानवतेची शिकवण देणारा रमजान पर्वला रविवारी संध्याकाळी समाजबांधवांनी जड अंत:करणाने निरोप दिला. विविध मशिदींमध्ये आठवडाभरापासून मुक्कामी (एतेकाफ) थांबलेल्या नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत घराकडे प्रस्थान केले. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
रमजान ईदचे आज नमाजपठण
By admin | Published: June 26, 2017 12:02 AM