नाशिक : मागील दोन वर्षांपासून मार्च-एप्रिल या कालावधीत रमजान पर्व येत आहे. यंदाही मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून रमजानला प्रारंभ झाला. दहा उपवास (रोजे) पुर्ण झाले आहेत. प्रौढांसह शाळकरी मुलेदेखील पाण्याचा घोट न घेता १३ तास ५० मिनिटांचा कडक उपवास करताना दिसून येत आहेत.
संयम, सदाचार व माणुसकीचा धडा देणारे पर्व म्हणून रमजान ओळखले जाते. २४ मार्चपासून आतापर्यंत उपवासाचा एकुण कालावधी साधारणत: १३ तास ३७ मिनिटांचा होता. रमजानच्या तीन खंडांपैकी कृपाखंडाची रविवारी (दि.२) सांगता झाली. दुसऱ्या मोक्षखंडाला (मगफिरत) प्रारंभ झाला असून अखेरचा तीसरा खंड हा नरकापासून मुक्ती मिळविण्याचा असल्याचे धर्मगुरू सांगतात. आता येथून पुढे दहा उपवास हे १३ तास ५० मिनिटांचे तर १२एप्रिलपासून पुढे अखेरचे दहा उपवास हे सुमारे चौदा तासांचे असणार आहेत.
गेले दहा दिवस समाजबांधवांची दिनचर्येत मोठा बदल झालेला दिसून येत आहेत. बाजारपेठांमधील मुस्लीम व्यावसायिकांच्या दुकानांच्या वेळादेखील बदलल्या आहेत. पहाटेपासूनच मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये लगबग सुरू झालेली दिसून येते. संध्याकाळी पुन्हा अशीच लगबग पहावयास मिळते. ‘रोजा’ ठेवण्यासाठी पहाटे ‘सहेरी’ व संध्याकाळी रोजा सोडण्याचा ‘इफ्तार’चा विधीमुळे बाजारात आगळेवेगळे चैतन्यमय वातावरणाची निर्मिती झालेली दिसते.
धार्मिक कार्यासह सामाजिक बांधिलकीचे भानरमजानमध्ये मुस्लीम बांधव गोरगरीबांसह अनाथ, निराधार, विधवा अशा समाजातील गरजू घटकांना सढळ हाताने ‘दान’ करताना दिसून येतात. जे धनिक मुस्लीम आहेत, ते ‘जकात’ वाटप करतात तर जे सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत ते गरजूंना कुटुंबातील सदस्यसंख्येप्रमाणे धान्यदान (फितरा) वाटप करतात. धार्मिक कार्यासह सामाजिक भानदेखील रमजानकाळात समाजबांधवांकडून जपले जाते. पहिले दहा उपवास पुर्ण झाल्यामुळे आता दानधर्मावर मुस्लीमांकडून भर दिला जाणार आहे. धनिक मुस्लीमांकडून ‘जकात’ वाटपाचे नियोजनदेखील करण्यात आले आहे.
‘इस्लाम’मध्ये रमजानचे विशेष महत्व!इस्लाम धर्माच्या पाच मुलस्तंभांपैकी दुसरा स्तंभ हा ‘रोजा’ मानला गेला आहे. यामुळे अल्लाहच्या उपासनेचा ‘रोजा’ हा प्रकार धार्मिकदृष्ट्या विशेष महत्वाचा आहे. रमजानचे रोजे हे प्रत्येक प्रौढ सुदृढ स्त्री-पुरूषांवर धर्माने बंधनकारक (फर्ज) केले आहेत. रमजान हा इस्लामी कालगणनेचा नववा महिना असून या महिन्यात धर्मग्रंथ कुराण संपुर्णपणे पृथ्वीतलावर प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबरांमार्फत अवतरित करण्यात आला, असे धर्मगुरू सांगतात.