नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदादेखील नाशिकचे आराध्यदैवत असलेल्या काळाराम मंदिरात रामनवमी साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. यंदादेखील कोरोनाच्या निर्बंधांमुळे भाविकांसाठी दर्शन बंद आहे. सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे रामनवमी उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे.
ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला गत मंगळवारच्या गुढीपाडव्यापासूनच सुरुवात झाली आहे. निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा आणि धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ करण्यात आला. काळाराम मंदिरात दरवर्षी गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार, यंदादेखील पूजापाठ करण्यात आले. मात्र, ज्याप्रमाणे निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सवाचा प्रारंभ गुढीपाडव्याला झाला, त्याप्रमाणेच रामनवमीचा मुख्य सोहळादेखील बुधवारी दुपारी मंदिरात केवळ मानकरी पुजारी आणि मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. चैत्र शुद्ध नवमी या तिथीला पंचांगांनुसार भगवान विष्णूचा सातवा अवतार मानल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्मदिन असल्यानेच या दिवसाला ‘रामनवमी’ असे संबोधले जाते. प्रभू श्रीरामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच माध्यान्ही दुपारी १२ वाजता झाला. त्यामुळेच काळाराम मंदिरासह सर्वत्र रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रभू श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली आणि जुईची फुले वाहिली जातात. त्यानंतर त्याची आरती करून रामजन्माच्या दिवशी रामजन्माचा पाळणा गाण्याची परंपरा शेकडो वर्षे सुरू आहे. हे सर्व धार्मिक विधी यंदादेखील पार पाडले जाणार असले, तरी जनसामान्य त्या अनोख्या रामजन्माच्या सोहळ्यास मुकणार आहेत. तसेच रथयात्रेचा सोहळादेखील मंदिराच्या परिघातच कामदा एकादशीला औपचारिक पद्धतीने पार पाडला जाणार आहे.
इन्फो
भाविकांना नाही प्रवेश
मंदिराचे सगळे दरवाजे रामनवमीलादेखील बंद राहणार आहेत. केवळ पुजाऱ्यांसाठी एक दरवाजा खुला राहणार आहे. तसेच मंदिरात केवळ यंदाच्या पूजेेचे मानकरी विलासबुवा पुजारी आणि अन्य पुजारीच रामजन्मोत्सवाचा सोहळा पार पाडणार आहेत. कोरोनाचे सावट असल्यामुळे पुजाऱ्यांशिवाय इतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सर्व भाविकांनी घरातील मूर्तीला ओवाळूनच यंदाचा जन्मोत्सव साजरा करून सर्व भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन काळाराम मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.