येवला : ज्याप्रमाणे गीतेमधून अर्जुनाला सांगताना लोकांना मार्गदर्शन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे भागवत कथेत अधिकारी व्यक्ती म्हणून राजा परीक्षिताला भागवताचा अधिकारी मानण्यात येते. कृष्ण अर्जुन या जोडीप्रमाणेच शुक मुनी आणि राजा परीक्षित आहेत. या जोडीला वैयक्तिक लाभासाठी भागवत कथा सांगितलेली नसून सर्व मानव जातीचा उद्धार व्हावा हा व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळेच भागवत कथा श्रवण हे परमपुरुषार्थ सिद्धीचे साधन बनले, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. पुरुषोत्तममासनिमित्त शहरातील विंचूर रोडवरील अयोध्यानगरी येथे अंबादास बनकर व परिवाराच्या वतीने श्रीमद्भागवत कथा व कीर्तन महोत्सव सोहळ्याचा आज दुसरा दिवस होता. याप्रसंगी रामगिरी महाराज बोलत होते. आज गुरु वारी सकाळी संजय महाराज धोंडगे यांचे कीर्तन झाले. यावेळी हजारो महिला व पुरुषांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी महंत रामगिरी म्हणाले की, नारद-व्यास संवादामध्ये विशेष चिंता होती ती लोकहिताची. प्रचंड शास्त्रनिर्मिती करूनही अपेक्षित लोककल्याणाची सिद्धी झालेली नसल्याने व्यासांना आत्मग्लानी आली होती. नारद-व्यास संवादाने व्यासांच्या आत्मग्लानीची निवृत्ती झाली. पण शुक-परीक्षित संवाद वरील दोन्ही संवादांपेक्षा विलक्षण आहे. शुकदेव निर्गुण भावामध्ये स्थित, निवृत्तिपरायण, आत्मनिष्ठ, ब्रह्मनिष्ठ आहेत. राजा परीक्षित लौकिक-ऐहिकाच्या चिंतेने मुक्त असून, त्याच्या अंगी पूर्ण वैराग्य बाणले आहे. या जोडीला वैयक्तिक वा लोकहित असे काही साधायचे नव्हते. दोघेही भागवत परायण, भगवंतांच्या यशोगाथांकडे आकृष्ट झालेले आणि शुद्ध मनाने वर्णन-श्रवणामध्ये तल्लीन झालेले होते. मनुष्यासाठी परमात्मा विषयक वर्णन आणि श्रवण हे एकमात्र त्याच्या परम पुरुषार्थाच्या सिद्धीचे साधन आहे. आणि तसे पाहता संपूर्ण भागवतपुराण श्रवण हेच परम पुरुषार्थाचे साधन आहे. मनुष्याचे जीवन क्षण क्षण क्षीण होत आहे. आयुष्य किती झपाट्याने पुढे सरकते याचा पत्ताच लागत नाही. क्षणभंगुर जीवनात महानातील महान प्राप्तव्य प्राप्त करून घेणे शक्य आहे. भागवताचे श्रवण, मनन, चिंतन हेच जीवमात्रासाठी परम कल्याणाचे साधन आहे. निर्गुणनिष्ठ ऋषीमुनीही भगवंतांच्या गुणानुवादात रमताना दिसतात.
मनन, चिंतन हेच परमकल्याणाचे साधन रामगिरी महाराज : कथा श्रवणात येवलेकर तल्लीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:41 AM
येवला : ज्याप्रमाणे गीतेमधून अर्जुनाला सांगताना लोकांना मार्गदर्शन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे भागवत कथेत अधिकारी व्यक्ती म्हणून राजा परीक्षिताला भागवताचा अधिकारी मानण्यात येते.
ठळक मुद्देसर्व मानव जातीचा उद्धार व्हावा हा व्यापक दृष्टिकोननारद-व्यास संवादामध्ये विशेष चिंता होती ती लोकहिताची