नाशिक : पूर्वजांना श्राद्धकर्माच्या माध्यमातून स्मरण करण्याच्या पितृपंधरवड्याच्या दुसऱ्या दिवशी रामकुंडावर श्राद्धकर्मासाठी गर्दी झाली होती. विविध पद्धतीच्या विधीच्या माध्यमातून लोकांनी पूर्वजांची आठवण करीत श्राद्धकर्म पार पाडले. २८ सप्टेंबरपासून पितृपंधरवाड्यास प्रारंभ झाला असून, १२ आॅक्टोबरपर्यंत घराघरात श्राद्ध घालण्यात येणार आहे. पूर्वजांचे आर्शीवाद प्राप्त होण्यासाठी श्राद्ध घालण्याची प्रथा आहे.पितृ लोकांचे तिथीनुसार श्राद्ध करण्यात येते, त्यास महालय श्राद्ध असे म्हटले जाते. पितृ लोकांची तिथी माहिती नसेल किंवा श्राद्ध राहिले असेल अशा सर्व पूर्वजांचे सर्वपित्री अमावस्याला श्राद्धकर्म करण्याची परंपरा आहे. घरातील व्यक्ती ज्या तारखेला दिवंगत झाली असेल त्या दिवशी श्राद्ध घालण्यात येते. श्राद्ध कर्म करण्याच्या विविध पद्धतींचा समावेश आहे. त्यात हिरण्य श्राद्ध, दर्पण विधी, चारूपिंड दान, आमपिंड दान, ब्राह्मण भोजन, हस्त श्राद्ध करण्याची पद्धत पुरातन काळापासून सुरू आहे. तसेच आप्त इष्टांना भोजन, ब्राह्मण सत्कार, गुरुजनांचा सत्कार, गायीचा गोग्रास करण्यात येतो. काकस्पर्शला विशेष महत्त्व यात मानले जाते. त्यासाठी पूर्वजांना श्राद्ध घालण्यासाठी कावळ्यांनी स्पर्श करावा यासाठी रामकुंडावर बहुतांश जण प्रतीक्षेत होते. तसेच परिसरात श्राद्धकर्म करणारे लोक दिवसभर ठिकठिकाणी कावळ्यांच्या शोधात दिसून आले. त्यातील बहुतांश लोकांना कावळ्याचे दर्शन न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. मात्र काकस्पर्शासाठी थांबण्याची गरज नसून दहाव्या दिवशी काकस्पर्शाची गरज असल्याचे पुरोहितांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शक्य असेल त्या पद्धतीने दिवंगत पूर्वजांचे महालय श्राद्धकर्म लोक करतात. त्यासाठी घराघरात श्राद्धकर्म तिथीनुसार सध्या सुरू आहे. त्यासाठी शहरात बहुतांश परिसरात नागरिक कावळ्याचा शोध घेताना दिसून आले. (प्रतिनिधी)
श्राद्धकर्मासाठी रामकुंडावर गर्दी
By admin | Published: September 30, 2015 12:09 AM