पंचवटी : नाशिक महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी नदीपात्राचे प्रदूषण थांबविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना प्रशासनाने कार्यमुक्त केल्याने संतप्त झालेल्या तब्बल ९५ सुरक्षारक्षकांनी शुक्र वारी (दि.१) सकाळी गोदावरी नदी (रामकुंडात) उतरून आंदोलन केले. गुरु वारी (दि.३१) सायंकाळी सर्वच सुरक्षारक्षकांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण थांबविण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, याच याचिकेनुसार उच्च न्यायालयाने प्रदूषण थांबविण्यासाठी मनपाला उपाययोजनेचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपाने वर्षभरापूर्वी नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामार्फत रामकुंड ते तपोवन दरम्यान नदीपात्राची सुरक्षा करण्यासाठी तसेच नदीपात्रात कोणी निर्माल्य, घाण, कचरा टाकू नये यासाठी कंत्राटी पद्धतीने ९५ सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती.प्रशासनाकडून फसवणूकमुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी नदी पात्रातील प्रदूषणमुक्तीसाठी गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून गोदा सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याबाबतचे लेखी पत्र नाशिक महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी याचिकाकर्ते देवांग जानी यांना दिले होते. नाशिक महानगरपालिका प्रशासनाने ठोस सबब न देता सदर सुरक्षारक्षकांना कमी करून मनपा प्रशासनाने उच्च न्यायालयाची फसवणूक करीत दिशाभूल केली आहे.
रामकुंडात सुरक्षारक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:58 AM