पंचवटी : रविवार कारंजा असो की शालिमार बसथांबा रिक्षाचालकांना काहीच फरक पडत नाही. बसथांबा असला तरी बस रस्त्यावर अन् रिक्षा बसथांब्यावर असेच काहीसे चित्र शहरातील मुख्य मार्गांवर दिसून येते. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत अशी परिस्थिती निर्माण झाली असून, अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांना आवर घालण्यापेक्षा वाहतूक पोलीस बसचालक व वाहकांनाच दमदाटी करत असल्याचा कटू अनुभव येत असल्याने सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बससेवेचा कणा मोडत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी भिवंडी येथील रिक्षाचालकाच्या मारहाणीत बसचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुखरूपपणे वाहतूक करणाऱ्या वाहक व चालकांच्या समस्यांकडे ना एसटी प्रशासन लक्ष देते ना वाहतूक शाखा, मग आम्ही तरी का वाईटपणा घ्यायचा, आम्हीही कौटुंबिक असून, आमची कोणीतरी घरी वाट बघतंय, असे असताना शहरातील बहुसंख्य रिक्षाचालक धमक्या देतात. मग, आम्हाला निमूटपणे ऐकून प्रवाशांची वाहतूक सुरू ठेवावी लागते, त्यातून भिवंडीसारखी एखादी घटना आमच्या बाबतीत न घडो एवढी तरी दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. अशा संतप्त प्रतिक्रिया काही बसचालक- वाहक यांनी व्यक्त केल्या. (वार्ताहर)
बसथांब्यांना रिक्षांचा गराडा
By admin | Published: February 12, 2017 12:37 AM