लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पहिल्याच पावसात शहराचा तलाव झाला असताना, महापौर मात्र प्रशासनाची पाठराखण करीत आहेत. महापौरांची कृती संशयास्पद असल्याचे सांगत पावसाळीपूर्व कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. मे महिन्यातच पावसाळीपूर्व कामे होणे अपेक्षित असतानाही ही कामे झाली नसल्याची तक्रार करीत या कामांची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी बोरस्ते यांनी केली आहे. पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्नही प्रशासन सोडवू शकत नसल्याने सत्ताधारी भाजपाचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.शहरात बुधवारी (दि. १४) झालेल्या पावसामुळे अवघ्या दीड तासातच शहर जलमय झाले. तसेच सराफ बाजारासह अनेक भागात दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वाहतूक खंडित झाल्याने महापालिकेचे पितळ उघडे पडले. या पार्श्वभूमीवर शिवसनेने गुरुवारी भाजपाला लक्ष्य करीत प्रशासनाला महापौर पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. मान्सून लवकर येणार असल्याने पावसाळीपूर्व कामे ही मे महिन्यातच होणे गरजेचे होते; मात्र ऐनवेळी ३१ प्रभागांत काम विभागून देण्यात आले. अनेक कामे तातडीने मंजूर करण्याची गरज असताना नाले सफाई, चेंबर्स दुरुस्तीसह स्वच्छतेचे विषय स्थायी समितीवर मांडूनही हे विषय मंजूर करण्यास टाळाटाळ करण्यात आली; मात्र दुसरीकडे भूसंपादनासारखे मलिद्याचे विषय वारंवार स्थायीवर का मांडले जातात असा प्रश्न त्यांनी केला. शहराचा तरण तलाव होण्याची गोम यात असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला. स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना प्रशासन पावसाळी पाण्याचाही प्रश्न सोडवू शकत नाही, या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याचा जाब प्रशासनाला विचारला जाणार आहे, असे सांगून येत्या महासभेत पावसाळीपूर्व कामांमध्ये गैरव्यवहारासंदर्भात लक्षवेधी मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पावसाळीपूर्व कामात गैरव्यवहार
By admin | Published: June 17, 2017 12:26 AM