उपनगर : तपोवन परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रामसृष्टी उद्यानाकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने वाताहत झाली आहे.नाशिकमध्ये देवदर्शनासाठी येणारे परराज्यातील शेकडो भाविक, पर्यटक हे दररोज तपोवन परिसरालादेखील भेट देत असतात. तपोवनात लक्ष्मण मंदिर, मारीच वधाचे ठिकाण, शूर्पणखा राक्षशिणीचे नाक कापलेली जागा, सीताकुंड, रामपर्णकुटी आदि पौराणिक ठिकाणांबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मनपाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून रामसृष्टी उद्यानाची निर्मिती केली आहे. रामसृष्टी उद्यानात विविध झाडे, छोटे छोटे पॅगोडा, अॅम्पी थिएटर, तसेच रामायणातील निवडक प्रसंगाच्या दर्शन घडविणारे शिल्प भिंतीवर साकारण्यात आले आहे. मात्र मनपाच्या दुर्लक्षपणामुळे रामसृष्टी उद्यानाची दिवसेंदिवस दुरवस्था होऊ लागली आहे.रामसृष्टी उद्यानातील अॅम्पी थिएटर परिसराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, वापर होत नसल्याने ते धूळखात पडून आहे. तसेच भिंतीवर साकारण्यात आलेल्या रामायणातील काही दृश्यांच्या शिल्पांभोवती गाजर गवत वाढल्याने पर्यटक व भाविकांना ते लांबूनच बघण्याची वेल आली आहे. गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरातील घाण, केरकचरा रामसृष्टी उद्यानात अडकून साचून पडला आहे. त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. (वार्ताहर)
‘रामसृष्टी’ उद्यानाची वाताहत
By admin | Published: August 27, 2016 10:34 PM